पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: March 30, 2015 02:07 IST2015-03-30T02:07:49+5:302015-03-30T02:07:49+5:30
तालुक्यातील लोहरा ईजारा आणि बुटी येथे प्रस्तावित पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून पवनचक्कीसाठी बेकायदेशीर जमीन हस्तगत केल्याचा आरोप होत आहे.

पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध
प्रकाश लामणे पुसद
तालुक्यातील लोहरा ईजारा आणि बुटी येथे प्रस्तावित पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून पवनचक्कीसाठी बेकायदेशीर जमीन हस्तगत केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नागरिकांनी फेरफारवर स्थगनादेशासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले आहे.
देशात बड्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन प्रकल्प उभारत आहे. बड्या कंपन्यांचे मालक आणि दलाल यांच्या संगनमतातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यात येत आहे. याचाच प्रत्यय पुसद तालुक्यातील लोहरा-ईजारा व बुटी येथील शेतकऱ्यांना येत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील लोहरा येथील शेतकरी सोमला वसराम राठोड यांनी पुसदच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले. तालुक्यातील लोहरा व बुटी परिसरात नियोजित पवनचक्की प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करताना भुलथापा देत नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गैरअर्जदार म्हणून शेंबाळपिंपरी येथील मंडळ अधिकारी, लोहरा येथील तलाठी, पुसद येथील राजेश कोटलवार व इतर नऊ जणांचा समावेश आहे.
या सर्वांनी संगनमत करून पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन हस्तगत करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम २४७ नुसार रितसर करण्यात आले नाही. शेत सर्वेनंबर १५४ मधील सोमला राठोड यांची जमीन एक हेक्टर ४४ आरचा करण्यात आलेला फेरफार बेकायदेशीर आहे. यावर स्थगनादेश मिळावा म्हणून सोमला राठोड यांनी अपिल दाखल केले आहे. याचा निकाल लागेपर्यंत पवनचक्कीसाठी बांधकाम करण्यात येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे.
पुसद तालुक्यातील लोहारा, इजारा, बुटी, सावरगाव आदी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहे.
वारस बाहेरगावी असताना शेतजमिनीबाबत संशयास्पदरीत्या व्यवहार झाल्याची चर्चा आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या मोजणीच्यावेळी या प्रकल्पातील शेतकरी व शेतमालक हजर नसल्याचीही माहिती आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. (प्रतिनिधी)