व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांची अडवणूक
By Admin | Updated: October 14, 2016 03:09 IST2016-10-14T03:09:35+5:302016-10-14T03:09:35+5:30
सॅम्पल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविल्यानंतर ठरलेला भाव न देता शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदीत शेतकऱ्यांची अडवणूक
पोलीस ठाण्यात तक्रार : शेतकऱ्यांशीच घातला जातो वाद
महागाव : सॅम्पल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविल्यानंतर ठरलेला भाव न देता शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध महागाव ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दहा क्ंिवटल सोयाबीन व्यापाऱ्यांनी स्वत:च ठेऊन घेतले आणि शेतकऱ्यांना हाकलून लावले, असा प्रकार गुंज येथे घडला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वेणी येथील शेतकरी जयराम रामचंद्र जाधव यांनी गुंज येथे सोयाबीन विक्रीकरिता आणला होता. भुसार मालाचे खासगी व्यापारी विठ्ठल पुंंड यांनी २२०० रुपये भाव देऊ केला. माल खाली करून घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी १८०० रुपये भाव दिला. ठरलेला भाव का दिला नाही असे शेतकऱ्यांनी विचारले असता व्यापाऱ्याने शेतकऱ्याशी हुज्जत घालून आपला माल परत घेऊन जा असे सुनावले.
सदर शेतकऱ्यांची दोनही मुले आजारी आहेत. त्यामुळे त्याला पैशाची तीव्र गरज आहे. याच मुळे त्याने आपला माल विक्रीला काढला परंतु व्यापाऱ्यांकडून फसवणूक करण्यात येत आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयावर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. गुंजपासून संपूर्ण तालुक्यात अशा खासगी भुसार माल खरेदीदार व्यापाऱ्यांचे जाळेच पसरले आहे.
माल खाली करून घेतल्यानंतर भाव कमी दिला जातो. प्रशासकाने याकडे लक्ष देऊन संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)