शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष

By Admin | Updated: December 11, 2014 23:15 IST2014-12-11T23:15:53+5:302014-12-11T23:15:53+5:30

जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे.

The farmers ignore everyone | शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष

शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष

वणी : जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गहन झाला आहे. तथापि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा शासनाच्या उदासीन धोरणामुळे आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी यावर्षी पुन्हा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार म्हणून सांगणारे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना कितपत प्रतिसाद देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने तर पुसणार नाही ना, अशी शंकता शेतकऱ्यांना सतावत आहे.
वणी तालुक्यात खरीपात २६ हजार शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टर शेतजमीनीवर कापसाची लागवड केली. चार हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली. शेतात पेरणी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हा महिना कोरडा पडल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. त्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने व पाहिजे त्या पधदतीने पाणी जमिनीत न गेल्याने पिकाची वाढ खुंटली. दरम्यान पिकांचे वेळापत्रक चुकल्याने वातावरणाचा फरक पिकांवर दिसून आला.
या सर्व बाबींचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट आली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे. शेतमालाला चांगले भाव मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला. परंतु दिवाळी या मोठ्या सणासाठी गरीब शेतकऱ्यांनी आपला कापूस सावकारास व व्यापाऱ्यास विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी सण साजरा केला. मात्र शेतीसाठी लागणारे पैसे निघणे अवघड झाले आहे. परिणामी पुढील वर्षाचा प्रपंचाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या घरी जे उत्पन्न आले, त्यात कापूस व सोयाबिनला हमी भावसुध्दा मिळत नाही. हमी भावापेक्षाही कमी किमतीने त्यांचा शेतमाल खरेदी केला जात आहे. नाईलाजास्तव शेतकरी तो विकत आहेत. तूर्तास कापसाला प्रति क्विंटल केवळ तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० रूपयांपर्यंतच भाव मिळत आहे. शासन मात्र चार हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव असल्याचा घोषा लावत आहे. सोयाबिनची तीच स्थिती आहे. त्यामुळे शासनाने या पिकांचे भाव वाढवून देण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी मतदारांसह शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र निवडणूक आटोपताच या सर्वांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकरी ेदेशोधडीला लागत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीच तयार दिसत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The farmers ignore everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.