शेतकरी कर्जमाफी, जिल्हा दारूबंदी ठराव
By Admin | Updated: June 13, 2015 02:30 IST2015-06-13T02:30:07+5:302015-06-13T02:30:07+5:30
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी असे दोन महत्वपूर्ण ठराव...

शेतकरी कर्जमाफी, जिल्हा दारूबंदी ठराव
जिल्हा परिषद : सर्वसाधारण सभेची एकमताने मंजुरी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी असे दोन महत्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केले. हे दोनही ठराव शासनाकडे पाठविले जाणार आहेत.
यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी गत काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात आले आहे. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी यवतमाळ जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीचे प्रा.घनश्याम दरणे यांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन या संदर्भात ठराव करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चेला आला. जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील आणि स्मिता कदम यांनी जिल्ह्यात दारूबंदी करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा ठराव सभागृहात मांडला. यालाही एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सरसकट ठिंबक सिंचन सुविधा पुरविण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. हे तीनही ठराव महत्वपूर्ण असून त्यासाठी शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी सभागृहात दिले. दारूबंदीच्या ठरावाला महिला सदस्यांनी उचलून धरले. त्यापाठोपाठ पुरुष सदस्यही या ठरावाच्या बाजूने उभे राहिले. ठरावाला विरोध करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातून दारू हद्दपार व्हावी यासाठी सर्व मिळूनच शासनस्तरावर प्रयत्न करू असे मत अनुमोदक माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी यावेळी मांडली. याला सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सत्ताधारी सदस्यांच्या आक्रमक पावित्र्याने ही बैठक गाजली. त्यातच एक सदस्य प्रशासनावर घसरले. (कार्यालय प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांवर बरसले सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्य
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रवादीचे सदस्य अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसल्याचे चित्र पहायला मिळाले. विविध विकास कामांच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांनीच अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामुळे विरोधी भूमिकेत असलेल्या भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. सत्ताधाऱ्यांकडूनच जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे सभागृहात काढले जात होते. माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पहिल्यांदाच सभागृहात आपला ‘परफॉर्मन्स’ दाखविला. याशिवाय अमोल राठोड यांनी घरकूल, कृषी विभागाची विशेष घटक योजना यातील फोलपणा उघड केला. अधिकाऱ्यांना थेट समोर बोलावून पुराव्यानिशी अपहार झाल्याचे आरोप त्यांनी केले. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. शिवाय अनुभवी प्रवीण देशमुख, प्रकाश कासावार, देवानंद पवार, अनिल नरवाडे, राकेश नेमनवार आणि वसंत चंद्रे यांनी विविध मुद्यांवर सभा गाजविली.