शेतकरी कर्जमाफीचा भोपळा

By Admin | Updated: June 30, 2017 02:00 IST2017-06-30T02:00:38+5:302017-06-30T02:00:38+5:30

थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Farmer's Debt Pumpkin | शेतकरी कर्जमाफीचा भोपळा

शेतकरी कर्जमाफीचा भोपळा

दुष्काळ वगळला : ३०९ कोटी पुनर्गठित कर्जमाफीला शेतकरी मुकणार
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात अध्यादेशामध्ये पुनर्गठनाच्या कर्जमाफीत २०१२ पूर्वीचे पुनर्गठन वगळले. या निकषामुळे पुनर्गठन झालेले २००९ व २०१० आणि २०१० व २०११ मधील ३०९ कोटींचे कर्ज कर्जमाफीतून बाद होणार आहे. याचा फटका एक लाख शेतकऱ्यांना बसणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अध्यादेशात निकषांमध्ये अनेक अडथळे निर्माण करून ठेवले. यामुळे कर्जप्रवाहातून दूर गेलेले शेतकरी पुन्हा मुख्य प्रवाहात येतील की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा २००० पासून सतत दुष्काळी स्थितीत आहे. त्याची शासन दप्तरी नोंद आहे. तरीही २०१२ ते २०१६ च्या दुष्काळी स्थितीचा उल्लेख अध्यादेशात नाही. या चार वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. याच काळातील थकीत पुनर्गठन माफ होणार आहे.
या चार वर्षांच्या कालखंडपेक्षाही भीषण स्थिती २००९-२०१० आणि २०१०-२०११ च्या कालखंडात होती. त्याचाही अध्यादेशात उल्लेख नाही. यामुळे या कालखंडातील पुनर्गठीत कर्जाचे शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा सर्वात मोठा आहे. २००९-२०१० मध्ये ८५ हजार शेतकऱ्यांच्या २४६ कोटी ८९ लाख रूपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले होते. हा आजपर्यंतच्या पुनर्गठनातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.

कर्जमाफीच्या अध्यादेशात २००९-१० आणि २०१०-११ मधील दुष्काळाचा उल्लेख नाही. या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्गठन झाले. हे पुनर्गठीत शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. जिल्हा बँक राज्य शासनाकडे याचे वास्तव मांडणार आहे.
- अविनाश सिंगम
सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ

Web Title: Farmer's Debt Pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.