कृषी दिनी पालकमंत्र्यांनी केली शेतात पेरणी
By Admin | Updated: July 2, 2015 02:49 IST2015-07-02T02:49:16+5:302015-07-02T02:49:16+5:30
येथून आठ किमी अंतरावर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या ईचोरी या लहानशा गावात पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी कृषी दिनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या ...

कृषी दिनी पालकमंत्र्यांनी केली शेतात पेरणी
यवतमाळ : येथून आठ किमी अंतरावर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या ईचोरी या लहानशा गावात पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी कृषी दिनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात परिस्थितीअभावी खोळंबलेली पेरणी स्वत: पूर्ण केली. आपल्यासह शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, कुणीही संकटांमुळे आत्महत्येसारखा विचार मनात आणून कुटुंबाला उघड्यावर पाडू नका, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली.
शासनासह सर्व समाजिक, राजकीय संघटनांनी हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष काम करून साजरी केली. ईचोरी येथील अंकुश विनायक खडके या शेतकऱ्याने २६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाला अद्याप शासनाकडून कोणती मदतही मिळाली नाही. संजय राठोड यांनी या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले होते. कृषी दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी दुपारी शेतात जाऊन अंकुशची पत्नी अनसूया, चौथ्या वर्गात शिकत असलेला मुलगा कुणाल यांची विचारपूस करून माहिती जाणून घेतली. कृषी दिनापासून सुरू झालेला शेतात श्रमदान करण्याचा हा उपक्रम २७ जुलैपर्यंत राबविला जाणार आहे.पालकमंत्र्यांसोबत यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, हरिहर लिंगनवार, राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, उपप्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)