नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
By Admin | Updated: March 7, 2017 01:25 IST2017-03-07T01:25:33+5:302017-03-07T01:25:33+5:30
बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे.

नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
दारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव घसरले, ग्रेडींग व वजनमापासाठी विलंब
दारव्हा : बाजारपेठेत तुरीचे भाव अचानक खाली आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे कल वळविला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणचे केंद्र बंद झाल्याने दारव्हा केंद्रही बंद होईल या धास्तीने शेतकऱ्यांची झुंबड वाढली आहे.
येथील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ गत महिनाभरापासून नाफेडच्या तूर खरेदीस सुरूवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने ग्रेडींग व वजनमापासाठी कालावधी लागत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्र लवकरच बंद होईल, असे समजून शेतकरी या केंद्रावर गर्दी करत आहे. यामुळे खरेदी केंद्रावरील यंत्रणांवर ताण पडत आहे.
यासंदर्भात पुणे येथील पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना एफएक्यू दर्जाच्या तुरीची खरेदी करण्यासाठी सध्या तूर खरेदी केंद्र कार्यरत असून प्रत्यक्ष तूर खरेदीचे कामकाज तेथे सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या बाजारपेठेत तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० या दराने तूर खरेदी केली जात आहे. केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ५० रुपये प्रती क्विंटल किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. किंमत स्थिरता निधी या योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई यांच्या नाफेड या संस्थेची राज्यस्तरीय एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
दारव्हा केंद्रावर २५० क्विंटल खरेदी
दारव्हा येथील केंद्रावर दररोज जवळपास २५० क्विंटल तूर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या तुरीमधील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्केच्या आत असल्याची तपासणी करून घ्यावी, तसेच नाव नोंदणीनंतर दिलेल्या तारखेला आपला माल केंद्रावर आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सुधीर जाधव यांनी केले आहे.