यक्षप्रश्न! दिवस चार अन् २ लाख क्विंटल सोयाबीन? शेतकरी धास्तावले
By रूपेश उत्तरवार | Updated: February 3, 2025 05:53 IST2025-02-03T05:52:26+5:302025-02-03T05:53:20+5:30
यवतमाळ : हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली. ही मुदतवाढ मिळाली त्याचवेळी दोन शासकीय ...

यक्षप्रश्न! दिवस चार अन् २ लाख क्विंटल सोयाबीन? शेतकरी धास्तावले
यवतमाळ : हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली. ही मुदतवाढ मिळाली त्याचवेळी दोन शासकीय सुट्ट्याही लागून आल्या. त्यामुळे उर्वरित चार दिवसांत दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणार कसे, हा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यातून शेतकरी धास्तावले आहेत.
खुल्या बाजारात सोयाबीनचे दर ३८०० ते ४००० रुपयापर्यंत खाली आहेत. हमी केंद्रावर सोयाबीनला ४८५१ रुपये क्विंटलचा दर आहे. त्यामुळे या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही दोन लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी आहे.
उर्वरित चार दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी झालेल्या सोयाबीनचे काटे आणि गोदामापर्यंत सोयाबीन पोहोचविण्याचे आवाहन यंत्रणेपुढे आहे. अखेरच्या चार दिवसांत खरेदी केंद्रावर गोंधळ झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पोलिस सुरक्षा पाठवावी लागेल, अशी स्थिती आहे.
एका दिवशी ठरावीक मेसेज
ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मेसेज पाठविले जातात. आता चार दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीनचे मेसेज पाठविताना एकच गोंधळ होऊ नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.
पूर्वीचेच सोयाबीन गोदामात पोहोचले नाही
यापूर्वी खरेदी झालेले सोयाबीन खरेदी केंद्रावरून शासकीय गोदामात पाठवावे लागते. त्यानंतर खरेदी झालेल्या सोयाबीनचे चुकारे मिळतात. दररोज मोठ्या प्रमाणात सोयाबीन येत आहे.
गोदामातही जागा कमी पडत आहे. यामुळे वाहन पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यातून अनेकांचे सोयाबीन गोदामातच पोहचले नाही. यामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.