वाळलेले पीक घेऊन शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By Admin | Updated: October 20, 2015 03:12 IST2015-10-20T03:12:32+5:302015-10-20T03:12:32+5:30
शेतातील वाळलेले उभे पीक उपटून बैलबंडीत भरून तालुक्यातील शेतकरी सोमवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले.

वाळलेले पीक घेऊन शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
घाटंजी : शेतातील वाळलेले उभे पीक उपटून बैलबंडीत भरून तालुक्यातील शेतकरी सोमवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले. लोकजागृती मंचच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा पुढचे पाऊल जिल्हा कचेरीवर धडकून तिथे शेतकरी मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा या मोर्चाचे नेतृत्त्व करणारे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी यावेळी दिला.
जगाचा पोशिंदा शेतकरी पण, तोच उपाशी राहतो, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्याच्या मदतीला सरकार धावत नाही. नाशिकमध्ये शाही स्नानासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, पण हजारो लिटर पाणी शाही स्नानाला दिले जाते. हा विरोधाभास का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अस्तित्वातील धरणाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. पण, दुसरे धरण बांधून जलक्रांतीची भाषा काही लोक करतात, असे मत पवार यांनी मांडले.
पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, शालिक चवरडोल आदींनी विचार मांडले. तहसीलदार एम.एम. जोरवर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, वास्तव पीक पैसेवारी काढा, कर्जमुक्ती, पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये मदत द्या, घाटंजी येथे सीसीआयची कापूस खरेदी, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी, भारनियमन बंद करा, अस्तित्वातील प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी द्या, सन २०१२ मधील महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
सभापती शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानाहून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. यावेळी ठाणेदार शिवा ठाकूर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (लोकमत चमू)