आर्णीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्याची वीरूगिरी
By Admin | Updated: March 3, 2017 01:59 IST2017-03-03T01:59:07+5:302017-03-03T01:59:07+5:30
येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर

आर्णीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्याची वीरूगिरी
रास्ता रोको : केंद्र सुरू करण्याची मागणी
आर्णी : येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर एका शेतकऱ्याने वीरूगिरी करीत टॉवरवर चढून केंद्र सुरू करण्याची मागणी केली.
गेल्या १५ फेब्रुवारीपासून येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातच पडून आहे. १५ दिवसांपासून तूर खरेदी झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. या संतापातूनच बुधवारी अनेक शेतकऱ्यांनी येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ठाणेदार संजय खंदाडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर शेतकरी बाजार समितीच्या प्रांगणात पोहोचले. तेथे विजय ढाले, सचिन यलगंधेवार आदींसह काही शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, निवासी तहसीलदार आर.जी. मांडवकर, राजू बुटले आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येत्या ८ मार्चपासून तूर खरेदीची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)