कर्जासाठी शेतकऱ्याला डांबले

By Admin | Updated: November 11, 2015 01:37 IST2015-11-11T01:37:32+5:302015-11-11T01:37:32+5:30

गृह कर्जाच्या वसुलीसाठी एका शेतकऱ्याला महिंद्रा फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच डांबून मारहाण केल्याची घटना घडली.

The farmer stays for the loan | कर्जासाठी शेतकऱ्याला डांबले

कर्जासाठी शेतकऱ्याला डांबले

महिंद्रा फायनान्सचा प्रताप : महिनाभरानंतर तक्रारीची दखल, तिघांंवर गुन्हा
यवतमाळ : गृह कर्जाच्या वसुलीसाठी एका शेतकऱ्याला महिंद्रा फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच डांबून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेतकऱ्याच्या अगतिकतेचा कडेलोट होत असून त्याच्या तक्रारींचीही दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे या घटनेने सिद्ध झाले.
राजेश भाऊराव बुरेवार (४५) रा. करमना ता. घाटंजी असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. पाच एकर शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या राजेशने २८ डिसेंबर २०१३ रोजी यवतमाळच्या एलआयसी चौकातील महिंद्रा फायनान्स कंपनीतून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परतफेडीसाठी सहामाही किस्तही पाडून घेतली. सुरुवातीला दोन किस्ता नियमित भरल्या. मात्र मुलाच्या शिक्षणामुळे पुढील किस्त भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीने वसुलीसाठी तगादा लावला. आॅफीसमध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार राजेश बुरेवार ९ आॅक्टोबर रोजी गावातील एका व्यक्तींकडून उसणे पैसे घेऊन एलआयसी चौकातील महिंद्रा फायनान्स कार्यालयात पोहोचला. त्यावेळी त्यांना एका रुममध्ये बसण्यास सांगितले. दीड तासानंतर कुणीच माहिती देण्यास कुणी तयार नव्हते. त्यावेळी राजेशने आॅफीसमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता एका व्यक्तीने त्यांची कॉलर पकडून खोलीत नेऊन डांबले. पैसे भरणे होत नसल्याचे स्टॅम्पवर लिहून देण्याची मागणी करू लागला. तेवढ्यात आणखी दोघे जण तेथे आले. त्यांनी मारहाण करीत कोऱ्या स्टॅम्पवर सही घेण्याचा प्रयत्न केला. राजेशने विरोध केल्यानंतरही या तिघांनी त्याच्याकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्यांच्याजवळील पाच हजार रुपये आणि मोटारसायकलची चाबीही या तिघांनी हिसकावून घेतली. तसेच खिशातील मोबाईलही फोडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एका खोलीत डांबून ठेवले. या प्रकाराने घाबरलेल्या राजेशने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीत अमोल गावंडे, प्रीतेश वडे, सतीश मुरकुटे या फायनान्सच्या तिघांनी डांबून मारहाण केल्याचे म्हटले होते. परंतु पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांंना दिलेल्या निवेदनावरून ९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी अमोल गावंडे, प्रीतेश वडे, सतीश मुरकुटे या फायनान्स कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. (कार्यालय प्रतिनिधी)

अनेक शेतकरी गळाला, वसुलीसाठी मानसिक छळ
जिल्ह्यात अनेक खासगी फायनान्स कंपन्यांनी अडचणीतील शेतकऱ्यांना गृह कर्जाच्या नावाखाली शेतीसाठी कर्ज दिले. आता या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांचे कर्ज थकलेले अनेक शेतकरी या फायनान्स कंपन्यांच्या गळाला लागत आहे. अशाच अडचणीतून राजेश बुरेवार यांनी कर्ज घेतले होते. राजेश बुरेवार यांच्याकडे महाराष्ट्र बँक आणि ग्रामीण बँकेचे एक लाख १५ हजार रुपये कर्ज थकीत आहे. त्यामुळे त्यांचा कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले. नियमित हप्तेही भरणार होते. परंतु मुलाच्या शिक्षणाच्या अडचणीने काही हप्ते थकले आणि यातून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांंना चक्क फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बोलावून डांबून मारहाण केली.

शेतकऱ्याने तक्रार देऊनही महिनाभर गुन्हा दाखल न करणे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी आपण दंडाधिकारी स्तरीय चौकशी लावणार आहो. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला याचा जाब द्यावा लागेल. सध्या गावागावात फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा कंपन्यांना अधिकार नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्जाची परतफेड करू नये. कुणी छळ करीत असेल तर माझ्याशी ९४२२१०८८४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- किशोर तिवारी
अध्यक्ष, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन.

Web Title: The farmer stays for the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.