मुंगोली वेकोलिच्या विळख्यात
By Admin | Updated: September 11, 2015 02:51 IST2015-09-11T02:51:25+5:302015-09-11T02:51:25+5:30
तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिच्या विळख्यात सापडले आहे.

मुंगोली वेकोलिच्या विळख्यात
पुनर्वसन रखडले : गावकरी करताहेत समस्यांचा सामना, २0 वर्षांपासून पदरी निराशाच
वणी : तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी भयभीत अवस्थेत गावात वास्तव्य करीत आहे. या गावाचे पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी २० वर्षात वेकोलिकडून पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार हाती घेण्याचे ठरवून येत्या १५ सप्टेंबरला रस्ता रोको आंदोलन करून वेकोलिचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.
वर्धा नदीच्या खोऱ्यात व वणी-कोरपना तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंगोली गावाजवळ २0 वर्षांपूर्वी सन १९९४ मध्ये मुंगोली व निर्गुडा कोळसा खाण वेकोलिने सुरू केल्या. त्यासाठी तेथील ७० टक्के शेतकऱ्यांच्या शेती वेकोलिने विकत घेतल्या. मात्र उर्वरित ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेती न घेतल्याने त्या शेतकऱ्यांना अद्यापही गाव सोडता आले नाही. गावापासून काहीच अंतरावर कोळसा खाणी असल्याने खाणीत होणाऱ्या स्फोटाचे धक्के गावाला बसतात.
कोळसा खाणींतील स्फोटांमुळे गावातील अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. काही घरे कधीही कोसळू शकतात, या भीतीखाली गावकरी गावात राहात आहे. मुंगोली गावाच्या पूर्वेस वर्धा नदी, पश्चिमेस १०० मीटर अंतरावर वेकोलिची कोळसा खाण, उत्तरेस वेकोलिच्या कैलासनगर वसाहतीच्या शौचालयाचे साचलेले घाण पाणी व दक्षिणेस ८० मीटर अंतरावर वेकोलिने टाकलेले मातीचे ढिगारे, असे चारही बाजूनी गाव कचाट्यात सापडले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव मुठीत धरून व वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
खाणीतील स्फोटांच्या धुळीमुळे व उष्णतेमुळे या परिसरातील शेतातील पिकांची वाढ खुटते. सोबतच शेती अनुत्पादक होत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची उर्वरित शेती वेकोलिने खरेदी करावी व गावाचे पुनर्वसन शिंदोला गावाजवळ करावे, अशी मागणी गावकरी सतत करीत आले आहे. ग्रामपंचायतीनेही तसा ठराव करून प्रशासनाला व वेकोलिला दिला आहे. मात्र त्याकडे सतत दुर्लक्षच होत आहे.
वेकोलिने तत्कालीन खासदार हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत १५ डिसेंबर २०१५ पर्यंत गावाचे पुनर्वसन करण्याचा करारनामा करून दिला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी वणीला जनता दरबार घेतला होता. त्यावेळीही माजी सरपंच बाबाराव ठाकरे यांनी मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी राठोड यांनी गावाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या होत्या.
त्यानुसार महसूल अधिकाऱ्यांनी गावाजवळचे कोळसा काढण्याचे काम वेकोलिने थांबवावे, अशी सूचना वेकोलिला दिली होती. मात्र वेकोलिने काम थांबविले नाही. उलट ७ सप्टेंबरासून वाढीव कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे गावकरी आता अधिकच भयभीत झाले आहे. गावकऱ्यांना नरकात राहत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे आता १५ सप्टेंबरपासून वेकोलिचे काम बंद पाडण्याचा इशारा सरपंच रूपेश ठाकरे व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)