कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कुटुंब संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:03 IST2019-08-12T22:01:25+5:302019-08-12T22:03:16+5:30
वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ शकतात, याचे वास्तव सर्वांसमोर मांडणारी घटना दारव्हा येथे घडली.

कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कुटुंब संकटात
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ शकतात, याचे वास्तव सर्वांसमोर मांडणारी घटना दारव्हा येथे घडली.
येथील आरोग्य विभागात परिचर असलेल्या अमोल गावंडे यांचा काही दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झाला. घरातला कर्ता पुरुष अचानक सोडून गेल्याने गावंडे कुटुंबावर आघात झाला. त्यांची आई, पत्नी, दोन मुलांना आधारच उरला नाही. कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती होती. अमोलच्या आजारपणात ती विकावी लागली. दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे घरातील महिलांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. घर खर्च भागवायला पैसे नाही. त्यात दोन मुलांचे शिक्षण, म्हातारी सासू हा सर्व भार कसा सोसावा, याची चिंता अमोलची पत्नी निता गावंडे यांना सतावत आहे.
दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे आता पतीच्या निधनाचे आभाळभर दुख: विसरून हे आव्हान निता यांनी स्विकारले. स्वाभिमानाने जगण्यासाठी निता यांना कुठलेही श्रम करण्यात कमीपणा वाटत नाही. कुटुंबासाठी त्यांनी कुणाच्याही मदतीची प्रतीक्षा न करता संघर्ष सुरू केला आहे. मात्र त्यांच्या एकाकी संघर्षामुळे महागाईच्या जमान्यात कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न मिटू शकत नाही. त्याचबरोबर वडिलांचे छत्र हिरावून घेतलेल्या मुलांचे पालन पोषण, शिक्षणाचा खर्च, म्हातारी सासू या सर्व जबाबदाºया नितावर येऊन पडल्या. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही. निता यांना शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून कुटुंबाची कायमस्वरूपी व्यवस्था होईल, अशा सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संकट काळात या कुटुंबाला विविध माध्यमातून मदतीची गरज आहे.
विविध संघटना पुढे सरसावल्या
निता गावंडे यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या येथील शाखेने गावंडे कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल झाडे, दिनेश शिंदे, विशाल हांडे, कल्पक देशमुख, श्रीकांत सहारे, प्रमोद दुधे, ओंकार निमकर, राम पापळकर यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आर्थिक सहकार्य केले.
जुनी पेन्शन योजना आवश्यक
२००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद करण्यात आली. मात्र कर्मचाºयांना पेन्शन मिळणे किती आवश्यक आहे, हे अमोल गावंडे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीवरून दिसून येते. पेन्शन योजना सुरू असती, तर अमोलच्या मागे कुटुंबाला आधार मिळाला असता. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा सुरू असल्याचे विशाल झाडे यांनी सांगितले.