माफियांवर आवळला फास
By Admin | Updated: May 13, 2015 02:09 IST2015-05-13T02:09:48+5:302015-05-13T02:09:48+5:30
जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी धाडसत्र सुरू केले.

माफियांवर आवळला फास
कळंब : जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी धाडसत्र सुरू केले. मंगळवारी कळंब तालुक्यातील बऱ्हाणपूर घाटावर धाड टाकून सहा ट्रेझर बोट, दोन जेसीबी मशीन आणि नऊ ट्रक जप्त केले. कंत्राटदाराला दोन लाख ३२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी रेती घाटावर धाड मारण्याची जिल्ह्यातील ही तिसरी कारवाई होय.
यवतमाळ जिल्ह्यात रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त होत आहे. गत महिन्यात बाभूळगाव तालुक्यातील नांदेसावंगी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी धाड मारुन कारवाई केली. त्या पाठोपाठ कळंब तालुक्यातील हिवरा दरणे रेती घाटावर धाड मारली. उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील रेती घाटावर धाड मारण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आपला मोर्चा कळंब तालुक्यातील बऱ्हाणपूर रेती घाटाकडे वळविला. अंगरक्षकाला घेऊन दुचाकीने रेती घाट गाठला.
या ठिकाणी होत असलेले उत्खनन पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले. जेसीबी मशीन आणि ट्रेझर बोटच्या सहाय्याने येथे उत्खनन सुरू होते. तसेच ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठेही करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन जेसीबी, सहा ट्रेझर बोट आणि नऊ ट्रक जप्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीची कार्यवाही प्रारंभ केल्यानंतर कळंबचे तहसीलदार आणि कर्मचारी रेती घाटावर पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसत्रामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बऱ्हाणपूर येथील अवैध रेती उत्खननाची तपासणी केल्यानंतर कंत्राटदार चेतन डहाके यांना दोन लाख ३२ हजार रुपये दंंड ठोठावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
तहसीलदारांना खुलासा मागणार
एकाच महिन्यात तब्बल दोन वेळा कळंब तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी रेती घाटावर धाड मारली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना तहसील प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. खुद्द जिल्हाधिकारी पोहोचल्यानंतर तहसीलदार घाटावर पोहोचतात. अवैध रेती उत्खननाबाबत संबंधित तहसीलदारांकडून खुलासा मागविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.