पायाभूत चाचणीत उडाला गोंधळ

By Admin | Updated: July 29, 2016 02:24 IST2016-07-29T02:24:19+5:302016-07-29T02:24:19+5:30

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा गुरूवारपासून सुरू झाली.

Failure to fly into the basic test | पायाभूत चाचणीत उडाला गोंधळ

पायाभूत चाचणीत उडाला गोंधळ

पेपरच्या झेरॉक्स : केंद्र प्रमुखांना मुख्याध्यापकांनी धरले धारेवर
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा गुरूवारपासून सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी आणि गणित या दोन विषयांची पायाभूत चाचणी परीक्षा गुरूवारी व शुक्रवारी घेतली जात आहे. त्यासाठी शाळांना बुधवारी पेपर पुरविण्यात आले. तथापि अनेक शाळांच्या प्रतिनिधींनी पेपर कमी मिळाल्याची ओरड केली. मात्र जिल्हा परिषदेतर्फे पटसंख्येच्या प्रमाणातच प्रत्येक तालुक्याला पेपर पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात गुरूवारी अनेक शिक्षकांनी काही पेपरच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पेपर दिल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली.
शिक्षण विभागाकडे मात्र कुणीही अधिकृतपणे पेपर कमी मिळाल्याची तक्रार केली नव्हती. त्यामुळे काही शिक्षक जाणूनबूजून तर अशी ओरड करीत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कमी पेपर मिळाल्याची ओरड अनाठायी असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि गुरूवारी पायाभूत चाचणी सुरू होताच, शिक्षकांची ओरड सत्य असल्याचे समोर आले. काही शिक्षकांनी तर चक्क झेरॉक्स काढून पेपरचा तुटवडा भरून काढला. त्यामुळे शिक्षकांनी कमी पेपर मिळाल्याची केलेली ओरड खरी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी पेपर कमी मिळाल्याच्या मुद्यावरून संबंधित केंद्र प्रमुखांना चांगलेच धारेवर धरले होते. जेवढे पेपर मिळाले, तेवढ्याच विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाईल, असा दम त्यांनी भरला. ही दरवर्षीचीच कटकट असून त्याला शाळा जबाबदार राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे केंद्र प्रमुखही काही काळ हबकून गेले होते. तथापि गुरूवारी मुख्याध्यापक व शिक्षकांनी पेपरची झेरॉक्स काढून अखेर विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेतली. मात्र काही शाळांनी जेवढे पेपर मिळाले, तेवढ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, तर एकच पेपर मिळाल्यामुळे काही वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षाच घेतली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. (शहर प्रतिनिधी)

शुक्रवारी होतोय दुसरा पेपर
पायाभूत चाचणी परीक्षेचा पहिला पेपर गुरुवारी घेण्यात आला. आता शुक्रवारी दुसरा पेपर होणार आहे. पहिलाच पेपर अनेक शाळांना कमी प्रमाणात मिळाला. तिच स्थिती दुसऱ्या पेपरचीही आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या पेपरच्या चाचणीतही शिक्षकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षकांनी झेरॉक्स केंद्रावर पेपरच्या प्रती काढण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र काही शाळांनी जेवढे पेपर मिळाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अट्टहास धरला आहे. परिणामी दुसऱ्या पेपरमध्येही काही शाळांमधील विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जातील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

 

Web Title: Failure to fly into the basic test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.