शेतकरी अपघात विमा दावा नाकारणे भोवले
By Admin | Updated: March 18, 2015 02:25 IST2015-03-18T02:25:33+5:302015-03-18T02:25:33+5:30
व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभ नाकारणे दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला भोवले आहे. शिवाय यवतमाळ तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

शेतकरी अपघात विमा दावा नाकारणे भोवले
यवतमाळ : व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभ नाकारणे दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला भोवले आहे. शिवाय यवतमाळ तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. खानगाव येथील उर्मिला विठ्ठलराव लिल्हारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने हा आदेश दिला आहे.
उर्मिला लिल्हारे यांचे पती विठ्ठलराव यांचा १९ जून २००९ रोजी अपघाती मृत्यू झाला. ते शेतकरी होते. शासनाने काढलेल्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्यांतर्गत उर्मिला लिल्हारे यांनी कृषी विभागाकडे विम्याच्या लाभासाठी अर्ज केला. मात्र बराच कालावधी लोटल्यानंतरही दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्यांना विम्याची रक्कम दिली नाही. शिवाय कृषी विभागाकडूनही सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात धाव घेतली.
मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य अॅड़ आश्लेषा दिघाडे आणि डॉ. अशोक सोमवंशी यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तीवाद झाला. दोनही बाजुंकडील युक्तीवादा अंती मंचाने उर्मिला लिल्हारे यांच्या बाजूने निर्णय दिला. दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्यांना एक लाख रुपये द्यावे आणि यवतमाळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने मानसिक, शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे एक हजार रुपये द्यावे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)