सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब
By Admin | Updated: July 11, 2015 00:11 IST2015-07-11T00:11:14+5:302015-07-11T00:11:14+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब
संगणक संच धूळ खात : जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती
कळंब : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही वर्षातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिक्षणतज्ज्ञांसाठी चिंतेची बाब झाली आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान यांचा अभाव आहे. शाळेला पुरविण्यात आलेले संगणकही शोभेची वस्तू ठरले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धुळ झटकली जाते, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे, तर अजूनही काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. यासाठी ते लोकप्रतिनिधींकडे वांरवार मागणी करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये किचन शेडच नाही. जेथे आहे त्याची अवस्था बिकट आहे. फार कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. कुठल्याही शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. गणवेश वाटपामध्येही नेहमीच विलंब होतो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होते.
मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटसंख्या रोडावत चालल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिक्षकवर्गही केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)