वणी, मारेगाववर जादा भार

By Admin | Updated: April 2, 2015 00:09 IST2015-04-02T00:09:22+5:302015-04-02T00:09:22+5:30

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात आज बुधवार १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली.

Extra burden on Wani, Maregaon | वणी, मारेगाववर जादा भार

वणी, मारेगाववर जादा भार

वणी : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात आज बुधवार १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रीचे सर्व ५१३ परवाने रद्द करण्यात आले. त्यामुळे आता या जिल्ह्यालगतच्या वणी, मारेगाव तालुक्यांवर जादा भार येण्याची शक्यता बळावली आहे.
राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारू मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज बुधवारी १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. त्यासंबंधीचे परिपत्रक गृह विभागाने यापूर्वीच निर्गमित केले होते. ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून या जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना सर्व दारू साठा जप्तीचे आदेशही देण्यात आले. तथापि चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य सम्राटांना आधीच्या शासन परिपत्रकानुसार त्यांचे तेथील दारू दुकान वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा वगळून राज्यात इतरत्र प्रचलित नियम आणि मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असा दिलासा दिला होता. मात्र आता सर्व ५१३ परवाने रद्द झाल्याने त्यांना राज्यात इतरत्र कुठे हे दुकान सुरू करता येईल किंवा नाही, याबाबत मद्य सम्राटांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची सीमा वणी तालुक्यालगत आहे. वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांनी ही सीमा विभागली गेली आहे. वणीपासून चंद्रपूरचे अंतर केवळ ५५ किलोमीटर आहे. वणीपासून या जिल्ह्याची सीमा कुठे केवळ दोन किलोमीटर, तर कुठे केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. काही गावांलगत तर केवळ पैनगंगा आणि वर्धा नदीच आडवी आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विके्रत्यांची नजर वणीवर खिळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्याने तेथील मद्य सम्राट लगतच्या यवतमाळ जिल्ह्यात शिरण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यातील इतर जिल्हे त्यांना दूर पडतात.
यवतमाळ जिल्हा आणि वणी, मारेगाव, झरीसारखे तालुके त्यांना जवळ पडतात. परिणामी त्यांची सर्वाधिक पसंती वणीला आहे. त्यानंतर मारेगाव आणि झरी तालुक्यावर त्यांचे लक्ष आहे. काहींनी महिनाभरापूर्वीच जागा व गावाचा शोध घेणे सुरू केले होते. आता प्रत्यक्षात दारूबंदी लागू झाल्यानंतर या प्रकियेला चांगलाच वेग आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीबाबत विचारणा केली असता, अद्याप कुणाचेही अर्ज प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही मद्य सम्राटांनी वणी, मारेगावात काही बिअर बार किरायाने घेतल्याची माहिती आहे. वणीत किमान तीन ते चार बार त्यांनी भाड्याने घेतले आहे. मारेगाव तालुक्यातही हाच प्रकार सुरू आहे. वणीतील काही बार आधीच मूळ मालकांनी दुसऱ्यांना भाड्याने दिले आहे. आता त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांची भर पडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी तालुक्यातील बारला आले सुगीचे दिवस
उत्पादन शुल्कच्या या उपविभागात वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यात देशी दारूचे ३२, तर ९३ बिअर बार, दोन वाईन शॉप आणि दोन बिअर शॉपी सुरू आहे. या उपविभागाने मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये शतक ओलांडले आहे. नव्याने देशी दारू आणि बिअर बार प्रस्तावित आहे. आता त्यात पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दुकाने स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीचे सुपिक खोरे मद्याच्या सुगंधाने न्हावून निघण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीमुळे या तीनही तालुक्यातील ‘बार‘ला सुगीचे दिवस आले आहे. चंद्रपुरातील विक्रेते चढ्या दराने येथील बार भाड्याने घेत आहे. त्यामुळे येथील बारचे भाड्याचे दर गेल्या महिनाभरात दुप्पट झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिन्याकाठी ठरावीक रक्कम मूळ मालकाला देऊन त्यांचे बार भाड्याने घेण्याचा सपाटाच वणी, मारेगाव, झरी तालुक्यात सुरू आहे.
चंद्रपुरात दारूची तस्करी वाढणार
लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात बुधवार १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात देशी, विदेशी दारू विक्रीची ५१३ दुकाने होती. ही सर्व दुकाने बुधवारपासून बंद पडली. यात सर्वाधिक दुकाने चंद्रपूर शहरात होती. ही दुकाने आता इतरत्र हलविण्याची परवानगी मिळाल्यास त्यांची पहिली पसंती यवतमाळ जिल्ह्याला राहणार आहे. सोबतच तेथे दारूबंदी झाल्याने आता या जिल्ह्यात दारूची तस्करी वाढण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातून दारूची तस्करी होते, तसाच प्रकार आता चंद्रपूर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. पैनगंगा, वर्धा नदी काठावरील गावांतून ही दारू तस्करी सोपी जाणार आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातील, परंतु चंद्रपूर जिल्हा सीमेलगतची गावे आता संवेदनशील ठरणार आहे. काही गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Extra burden on Wani, Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.