एसटीची ‘ओटी’वर उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:14 IST2017-08-27T23:14:14+5:302017-08-27T23:14:58+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नियोजनाची पूर्णत: वाट लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास आगाराच्या उत्पन्नाचा आलेख घटलेला आहे.

एसटीची ‘ओटी’वर उधळपट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नियोजनाची पूर्णत: वाट लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास आगाराच्या उत्पन्नाचा आलेख घटलेला आहे. यासाठी विविध कारणांचा पाढा वाचला जातो. मात्र काही बाबींवर प्रचंड उधळपट्टी होत आहे. विशिष्ट कामगारांना दिली जाणारी अतिरिक्त कामगिरी आणि त्यापोटी दिला जाणारा अतिकालिक भत्ता (ओ.टी.) हे एक प्रमुख कारण आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेला हा प्रकार विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकाºयांकडून सोयिस्कर दुर्लक्षित आहे.
कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी द्या, अशा महामंडळाच्या सूचना आहेत. या वेतनश्रेणीतील कामगारही यासाठी उत्सुक आहे. परंतु स्थानिक पातळीवरील अधिकारी या सर्व बाबी बाजूला सारून विशिष्ट लोकांचे हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे. ७० रुपये तास अतिकालिक भत्ता असलेल्या अर्थात कमी वेतनश्रेणीच्या कामगारांऐवजी २०० रुपये तास भत्त्याचा दर असलेल्या कामगारांना डबल ड्यूटी दिली गेल्याचे प्रकार यवतमाळ आगारात पुढे आले आहे. एवढेच नाही तर १०० तासांच्यावर अतिरिक्त ड्यूटी करून हजारो रुपये अतिकालिक भत्ता काही कामगारांनी उचलला आहे. दरमहा सुमारे आठ ते नऊ लाख रुपये अतिकालिक भत्त्यापोटी जादा दिले जात आहे. म्हणूनच आगार तोट्यात असल्याची ओरड कामगारांमधून होत आहे. विशिष्ट कामगारांनाच अतिरिक्त कामगिरी दिली जात असल्याच्या बाबीवर कामगारांमधून शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित कामगारांच्या वेतनाचा हिशेब केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कामगार तुटवड्याचा कांगावा
चालक-वाहकांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून अतिरिक्त कामगिरी सोपविली जाते. हा निव्वळ कांगावा आहे. अनेक चालकांना इतर ठिकाणी अर्थात सोयीच्या जागी ड्यूटी दिली जात आहे. प्रामुख्याने चालकांना याठिकाणी गुंतविले गेले आहे. वर्कशॉप, विभागीय कार्यालय वर्कशॉप आदी ठिकाणी चालकांची ड्यूटी लावली गेली. दोन-चार दिवसच नव्हे तर काही चालकांना महिना-महिना ‘निमआराम’ कामगिरी देण्यात आली आहे. याठिकाणी त्यांचा आर्थिक लाभ नसला तरी आरामदायी ड्यूटी मिळावी यासाठी ही सारी सर्कस करण्यात आली आहे. परिणाम मात्र वाहक तुटवड्यावर सांगितला जात आहे.