निर्मनुष्य रस्ते आणि फटाक्यांची आतषबाजी

By Admin | Updated: February 16, 2015 01:49 IST2015-02-16T01:49:50+5:302015-02-16T01:49:50+5:30

रविवार बाजाराचा दिवस. एरव्ही रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. मात्र रविवारी सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट. कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही.

Exquisite Roads and Fireworks Fireworks | निर्मनुष्य रस्ते आणि फटाक्यांची आतषबाजी

निर्मनुष्य रस्ते आणि फटाक्यांची आतषबाजी

यवतमाळ : रविवार बाजाराचा दिवस. एरव्ही रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. मात्र रविवारी सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट. कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही. लग्नाची दाट तिथी असतानाही मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती. अशी अघोषित संचारबंदी रविवारी यवतमाळ शहराने अनुभवली. निमित्त होते, वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीचे. भारताने फलंदाजीला सुरुवात केली. प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली. चौकार-षटकारांची फटकेबाजी होत असताना बाहेर फटाक्यांची आतषबाजी होत होती. तर पाकिस्तान संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर प्रत्येक विकेटला शहरात फटाके फुटत होते. विजयाचा क्षण आला आणि यवतमाळ शहरासह जिल्ह्याने दुसऱ्यांदा दिवाळीचा अनुभव घेतला. चौकाचौकात फटाके फोडून पाकवर मिळविलेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता.
क्रिकेट विश्वातील अत्यंत रोमहर्षक होणारा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी रंगला. लाखो प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दोन दिवसांपासूनच तयारी चालविली होती. त्यातच रविवार हा सुटीचा दिवस आल्याने आनंदात आणखीच भर पडली. प्रत्येक जण घरातील दूरचित्रवाणी संचापुढे बसलेला होता. परिणामी रविवार हा बाजाराचा दिवस असतानाही यवतमाळ शहरातील रस्ते अगदी निर्मनुष्य होते. शहराचा दत्त चौक रविवारी सकाळपासूनच गजबजलेला असतो. मात्र या परिसरातही शुकशुकाट जाणवत होता. भाजीमंडईसह आठवडी बाजारातील कोलाहल शांतशांत वाटत होता. कुणीही घराबाहेर पडत नव्हते. शहरातील इतर भागांचीही अशीच अवस्था होती. अतिशय महत्वाच्या कामासाठीच बाहेर निघत होते. मात्र त्यांचेही मन क्रिकेटच्या मॅचमध्येच दिसत होते. कुठेही दुकानात दूरचित्रवाणी संच दिसला की तेथे डोकावून पाहत असल्याचे चित्र दिसत होते.
रविवारी लग्नाची तिथी दाट होती. शहरातील प्रत्येक मंगल कार्यालय लग्नासाठी बुक होते. मात्र या ठिकाणीही अपेक्षित गर्दीच दिसत नव्हती. नवरदेवाच्या वरातीत नाचायलाही तरुण तयार नव्हते. महिला मंडळींचीच गर्दी आज निघालेल्या वरातीत दिसत होती. मंगल कार्यालयातही असाच काहीसा अनुभव येत होता.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शहराच्या विविध भागातून फटाक्यांचे आवाज येत होते. ५ वाजता भारताने सामना जिंकला आणि शहरभर फटाक्याची एकच आतषबाजी झाली. प्रत्येक जण विजयाचा जल्लोष साजरा करीत होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Exquisite Roads and Fireworks Fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.