पांढरकवडा येथील पर्यटकांना व्याघ्र दर्शन : टायगर प्रोजेक्टचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा, पर्यटक वाढले यवतमाळ : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील टिपेश्वर अभयारण्यामध्ये (ता. पांढरकवडा) डझनावर वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. हे वाघ पर्यटकांना अभयारण्यात येण्यासाठी खुणावत आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून टिपेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १४८ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यात यंदाच्या व्याघ्र गणनेत ट्रॅप कॅमेरांमध्ये नऊ वाघांचे अस्तित्व नोंदविले गेले. मात्र कॅमेरापुढे न आलेले आणखी काही वाघ अभयारण्यात असण्याची शक्यता आहे. वन खात्याची यंत्रणा मात्र वाघांचा शोध घेण्याचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने वाढीव वाघांचे अस्तित्व नाकारत आहे. अभयारण्या बाहेर लगतच्या झरी तालुक्यातसुध्दा आठ ते नऊ वाघांचे अस्तित्व आहे. हे वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्प किंवा तेलंगणा राज्यातून आलेले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. वाघांच्या या अस्तित्वामुळे झरी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघांच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला. वाघांनी अनेक पाळीव जनावरांचाही फडशा पाडला. एकीकडे टिपेश्वर अभयारण्यामध्ये व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तर दुसरीकडे झरी तालुक्यात याच व्याघ्र दर्शनाने नागरिकांची बोबडी वळते आहे. वाघाच्या भीतीने अनेकांनी भल्या पहाटे आणि सायंकाळी शेतात जाणेही टाळले आहे. पूर्वी टिपेश्वरमध्ये केवळ दोन वाघ होते. आता ही संख्या नऊ वर गेली आहे. भविष्यात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. झरी तालुक्यात वावरणारे वाघही टिपेश्वरमध्ये आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा (टायगर प्रोजेक्ट) दर्जा मिळावा अशी पर्यटकांची मागणी आहे. वर्धा-नागपूर जिल्हा सीमेवरील बोर अभयारण्याला अवघ्या चार वाघांच्या अस्तित्वावर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला असताना टिपेश्वरला विलंब का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तीन वाघांनी घेरलेपांढरकवडा येथील अभय डोंगरे, भूषण इसासरे, प्रवीण नंदनकर, वनपाल अक्कुलवार यांना गुरुवारी सायंकाळी ४ वाजता हापशी पॉर्इंटवर तीन वाघांनी सुमारे सव्वातास घेराव घातला. वाहनात असल्याने हे पर्यटक बचावले. मात्र वाघांनी त्यांना जागेवरून हलूही दिले नाही.
टिपेश्वर अभयारण्यात डझनावर वाघांचे अस्तित्व
By admin | Updated: January 30, 2016 02:40 IST