विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्यात घोळ

By Admin | Updated: October 3, 2016 00:19 IST2016-10-03T00:19:05+5:302016-10-03T00:19:05+5:30

पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला.

The excitement for the acquisition of the Vihir | विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्यात घोळ

विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्यात घोळ

नेर : पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला. संपूर्ण गाव साक्षीदार असलेल्या प्रकरणातही मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्याला पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
बोंडगव्हाण येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ एप्रिल २०१६ रोजी पांडुरंग राऊत या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहित केली. ग्रामस्थांना नियमित आणि सुरळीत पाणी मिळावे यासाठी फुटलेली पाईपलाईनही या शेतकऱ्याने दुरुस्त केली. टंचाई काळात गावकऱ्यांनी या विहिरीच्या पाण्याचा वापर केला. ग्रामसेवकाने मात्र मोबदला रामभाऊ राऊत यांना दिला. ३६ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला.
संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले असताना मोबदला दुसऱ्याला कसा, असा प्रश्न पांडुरंग राऊत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनीही आम्ही पांडुरंग राऊत यांच्या विहिरीचे पाणी वापरल्याचे निवेदन दिले. यानंतरही त्यांना मोबदल्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रामसेवकाने हा घोळ घातल्याचा आरोप आहे.
या संदर्भात ग्रामसेवक के.डी. निबोळकर यांना विचारले असता, विहीर अधिग्रहित केल्याचे दोन्ही शेतकऱ्यांचे ठराव पंचायत समितीला सादर केले होते. पांडुरंग राऊत यांचा अर्ज खारिज झाला होता. रामभाऊ राऊत यांचा अर्ज मंजूर झाल्याने धनादेश त्यांच्या नावाने निघाला, असे ते म्हणाले. यावर शेतकरी पांडुरंग राऊत म्हणाले, आपला अर्ज खारिज झाल्याचे पत्र मिळालेच नाही. ग्रामस्थांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले. ठराव मंजूरीचे पत्र आपल्याकडे असताना रामभाऊ राऊत यांच्या नावाने धनादेश कसा काढण्यात आला, हा त्यांचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The excitement for the acquisition of the Vihir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.