लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले. यवतमाळसह कळंब, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून उमरखेडमध्ये विक्रमी ११२.०१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर त्या पाठोपाठ महागावमध्ये ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून-जुलै या महिन्यात जिल्ह्यात साधारण ४२०.६ मिमी पाऊस होतो. बुधवारपर्यंत ५५५.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९२६ मिमी इतकी आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६७०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस ७८.२ टक्के इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात ६२ टक्के पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरीच संकटात सापडले आहे. कपाशी, सोयाबीन आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिके सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची अपेक्षा आहे.
घानमुख येथे अतिवृष्टीमुळे मातीबांध वाहून गेला- बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सांडव्यालगतचा मातीबांध पूर्णतः वाहून गेला आहे. पाण्यामुळे त्या खालील शेती खरडली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. - सन २००३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला, असे देविदास मोहकर यांनी सांगितले. कालव्याच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी सांडव्याला जॅकेटिंग करणे, गाईडवॉल प्रोव्हाईड करणे, टेल चॅनलचे खोदकाम करणे, आदी कामांचे प्रस्ताव एक वर्षापूर्वीच मंजुरीसाठी पाठविल्याचे उमरखेडचे जलसंधारण अधिकारी विवेक पिंपोले यांनी स्पष्ट केले.