रोहित्रांवर वाढला अतिरिक्त दाब
By Admin | Updated: November 30, 2014 23:14 IST2014-11-30T23:14:46+5:302014-11-30T23:14:46+5:30
खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे.

रोहित्रांवर वाढला अतिरिक्त दाब
नेर : खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. शिवाय फळबागांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. यावर विद्युत कंपनीकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
तालुक्यात निर्धारित वेळेशिवायसुद्धा इतरवेळी भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो. जेव्हा वीज असते तीही कमी दाबाची राहात असल्याने मोटरपंप चालत नाही. शिवाय काही प्रसंगी जळत असल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड खर्चाइतकेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे याची चिंता लागली आहे. आता रबीचे पीक घेवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतानाच वीज मंडळाचे भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेचे भूत मानगुटीवर बसले आहे.
तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय फळबागाही आहे. या पिकांना सद्यस्थितीत पाणी देण्याची अतिशय आवश्यकता आहे. परंतु दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहात असल्याने काही शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्र जागावी लागते. या स्थितीत वन्य जीवांपासूनही त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त विद्युत जोडण्या असल्याने बऱ्याच रोहित्रांवर अतिरिक्त दाब येत असल्याने पुरवठा सुरळीत ठेवण्यात ते अकार्यक्षम ठरत आहे. परिणामी कृषी पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. मोटरपंपाच्या संख्येनुसार नवीन रोहित्र बसविणे गरजेचे आहे. परंतु यासाठी अनेक अडचणी विद्युत कंपनीकडून सांगितल्या जात आहे. शिवाय छोटासा बिघाड काढण्यासाठीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सहकार्य मिळत नाही. अशावेळी त्यांना स्वत:च्या खिशातून खर्च भागवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
विजेसंबंधीचे प्रश्न तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी विद्युत कंपनीला निवेदन देण्यात आले. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी स्नेहल भाकरे, निखिल जैत, प्रवीण राठोड, सुजित कुंभारे, विशाल चहाकार, गोपाळ चव्हाण, लक्ष्मण कराळे, शंकर चव्हाण, संजय राठोड, किशोर अरसोड, विलास चव्हाण, पंडित चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)