परीक्षा केंद्र सुविधांत नापास
By Admin | Updated: February 21, 2015 01:29 IST2015-02-21T01:29:14+5:302015-02-21T01:29:14+5:30
वर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना

परीक्षा केंद्र सुविधांत नापास
यवतमाळ ल्ल लोकमत चमू
वर्षभर अभ्यास करून परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. परीक्षा केंद्रावरील असुविधांनी त्यांच्या मन:स्तापात भर पडत असून परीक्षेतही मन लागत नाही. ‘लोकमत’ने १६ ही तालुक्यातील निवडक शाळांचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. वीज, पाणी आणि प्रसाधनगृहांचा अभाव दिसून आला. काही ठिकाणी ऐन परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. तर काही केंद्रांवर पंख्यांची डागडुजी सुरु होती.
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देत आहे. शासनाने सर्व परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे. शहरी भागातील काही शाळांचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील शाळांमधील परीक्षा केंद्रावर आनंदी आनंदच दिसून आला. पुसद तालुक्यातील सांडवा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या आदल्यादिवशी शुकशुकाट होता. प्राचार्यांनी शाळेला सुटी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची टाकी उघड्यावरच आढळून आली. अनेक ट्युब लाईन आणि पंखेही नादुरुस्त असून डेस्क बेंचही अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यवतमाळ या जिल्हा मुख्यालयी असलेल्या परीक्षा केंद्रावरच सुविधांचा अभाव आहे तर इतर केंद्रांबाबत न बोललेलेच बरे. यवतमाळच्या गोदनी मार्गावर जिल्हा परिषद शासकीय मुलांची शाळा आहे. परीक्षेसाठी १४ खोल्या आरक्षित करण्यात आल्या. परंतु या शाळेत समस्यांचा डोंगर आहे. सहा महिन्यापूर्वी थकीत बिलामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कोणत्याही वर्गात पंखाच काय लाईटही नाही. अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा देणार असून प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. दारव्हा येथील जिल्हा परिषद ऊर्दू विद्यालयात डेस्क बेंच, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली तरी शौचालयात मात्र जाणे कुणालाही शक्य नाही. महागाव तालुक्यातील सवना येथील शिवाजी विद्यालयात तर परीक्षेच्या आदल्यादिवशी वर्ग खोल्यातील पंखे आणि लाईटची दुरुस्ती सुरू असल्याचे दिसून आले. उमरखेड शहरातील जिल्हा परिषद शाळेची तर व्यथाच न्यारी. दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत बारावीचे परीक्षा केंद्र आहे. परीक्षेमुळे येथील शाळा सकाळच्या सत्रात घ्यावी लागते.
परीक्षा केंद्रावर नेमक्या कोणत्या सुविधा हव्या आणि काय करायला हवे याबाबत निश्चित कुणालाच माहीत नाही. वणी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. मात्र भाडे कोण देणार हा प्रश्नच आहे. इतर परीक्षा केंद्रावर शिक्षक धावपळ करताना दिसत होते. बारावीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविले जाते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी साधे स्वच्छता अभियानही राबविले जात नाही.