प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:22+5:30

रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनच्या वतीने आयोजित ‘एज्युफेस्ट’ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते म्हणाले, रोटरीतर्फे शिक्षण या विषयावर सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. चांगल्या लोकांसोबत भेटणे, बोलणे हेही एकप्रकारचे शिक्षणच आहे.

Everyone must come to Marathi | प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे

प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे

googlenewsNext
ठळक मुद्देविजय दर्डा : रोटरी क्लबच्या तीन दिवसीय ‘एज्युफेस्ट’चा दिमाखदार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्या राज्यात आपण राहतो, तेथील भाषा आपल्याला आलीच पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा लिहिता-बोलता आलीच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनच्या वतीने आयोजित ‘एज्युफेस्ट’ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते म्हणाले, रोटरीतर्फे शिक्षण या विषयावर सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. चांगल्या लोकांसोबत भेटणे, बोलणे हेही एकप्रकारचे शिक्षणच आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी प्रयत्न करीत आहे. मात्र हे दाखले ऑनलाईन का मिळू नये? यासंदर्भात मी सरकारकडे बाजू मांडणार आहे.
विद्यार्थ्यांना उद्देशून विजय दर्डा म्हणाले, ज्यात तुम्हाला रूची आहे, ते शिक्षण घ्या. ठराविक करिअरच्या मागे न लागता आज विविध मार्ग उपलब्ध झाले आहे. स्पोर्ट, सिनेमा, मीडिया हेही खूप मोठे क्षेत्र आहे. शिक्षणाला जीवनशिक्षणाशी जोडण्याची गरज आहे. भारताच्या प्रगतीचा यूएसबी हा भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे मूल्य डोळ्यापुढे ठेवून शिक्षण घ्या.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप हिंडोचा यांनी रोटरीच्या विविध सामाजिक कामांचा आढावा विशद केला. शिक्षण आणि आरोग्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिव प्रवीण दर्डा, सचिव विजय गंडेचा, जयप्रकाश जाजू, किशोर जाजू, परेश लाठीवाला, नीलेश ढुमे, विजय शेटे, जगजितसिंग ओबेराय, विजय अडतिया, प्रा. सचिन भालेराव, डॉ. सुरेंद्र पद्मावार, प्रकल्प संचालक सचिन श्रीवास, विवेक बुटले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियता प्रवीण दर्डा यांनी केले.

प्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रपट लेखिका यांची मुलाखत

विजय दर्डा यांनी मला प्रकाशझोतात आणले - बैजू पाटील
समारोपीय कार्यक्रमात अजय गंपावार यांनी घेतलेली प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील आणि चित्रपट लेखिका मनिषा कोरडे यांची मुलाखत लक्षवेधी ठरली. पुरस्कारांची पर्वा न करता मी काम करीत गेलो. मात्र पहिल्यांदा विजय दर्डा यांनी माझ्या छायाचित्रांचे ‘कॉफिटेबल बुक’ प्रकाशित करून मला प्रकाशझोतात आणले, अशी कृतज्ञता यावेळी बैजू पाटील यांनी व्यक्त केली. तरुणांनी आवडीचे क्षेत्र निवडून मन लावून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘लोकमत’ने अनेकांना लिहिते केले - मनीषा कोरडे
तर चित्रपटाकडे केवळ हिरो बनण्याचे माध्यम म्हणून न बघता, करिअरचा वेगळा मार्ग म्हणून बघावे, असे आवाहन मनिषा कोरडे यांनी केले. मी नागपूरच्या एलएडी कॉलेजमध्ये शिकत असताना ‘लोकमत’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लिखाणाची संधी दिली होती. त्यावेळी लिहिणारे अनेक तरुण आज लेखक, पत्रकार झालेत. ‘लोकमत’ने रुजविलेल्या लिखाणाच्या बिजातून आज काही झाडे झाली काही वेली झाल्या, अशा शब्दात कोरडे यांनी ‘लोकमत’चेही आभार मानले.

विद्यार्थ्यांना बक्षीस
एज्युफेस्ट अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी विजय दर्डा, प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील, चित्रपट लेखिका मनिषा कोरडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. वादविवाद स्पर्धेत यश चव्हाण, प्रितीक्षा येरणे, पल्लवी प्रजापती, झुबिया सलीम, पायल किनाके, साक्षी मुनेश्वर गायन स्पर्धेत वेदांत चव्हाण, अनघा लोणारे, राशी कंटूरवार, आशीष कैथवास, अंकित कैथवास, आयुष दुधे यांनी बक्षिसे पटकावली. तर नृत्य स्पर्धेत बाबाजी दाते महाविद्यालय, अँग्लो हिंदी हायस्कूल, अभ्यंकर कन्या शाळा आणि राणी लक्ष्मीबाई शाळेच्या चमूंनी बक्षिसे पटकावली.

Web Title: Everyone must come to Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.