ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा राष्ट्रवादीच्या दावणीला

By Admin | Updated: July 13, 2015 00:12 IST2015-07-13T00:12:10+5:302015-07-13T00:12:10+5:30

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत निर्णायक असलेल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत.

Even in the Gram Panchayat elections, NCP's candidate from DAVPANI, | ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा राष्ट्रवादीच्या दावणीला

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा राष्ट्रवादीच्या दावणीला

नेत्यांची उदासीनता : वाघापूर, पिंपळगावमध्ये एकही उमेदवार नाही
यवतमाळ : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत निर्णायक असलेल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. मात्र, याही निवडणुकीत भाजपा हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचे स्पष्ट होते. नगर परिषदेतील युती ग्रामपंचायतीमध्येही कायम आहे. इतकेच नव्हेतर वाघापूर, पिंपळगाव या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींमधून भाजपाकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र मनातून दुखावले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसल्या तरी शहरालगतच्या वडगाव, लोहारा, भोसा, वाघापूर, पिंपळगाव या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये थेट राजकीय पक्षांचाच हस्तक्षेप असतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी तशी तयारीही केली आहे. बहुतांश गावात या तिन्ही पक्षांचे स्वतंत्र पॅनल आहे. मात्र, येथील सत्ताधारी भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीत स्वारस्यच दाखविलेले नाही. नेहमीप्रमाणे भाजपाने सोयीची भूमिका घेत राष्ट्रवादीसोबत घरठाव मांडला आहे. यामुळे भाजपातील निष्ठावंत स्थानिक कार्यकर्ते पुन्हा उपरेच ठरले आहेत. स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणे अपेक्षित आहे. नेमके याच ठिकाणी स्थानिक आमदार स्वत:ला अलिप्त ठेवत असल्याने भाजपातील अनेकांची अडचण झाली आहे. केवळ वडगाव, भोसा आणि लोहारा येथे काही मोजक्या जागा घेऊन राष्ट्रवादीसोबत निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा भाजपा आमदाराने नगर परिषदेत भाजपाचे संख्याबळ असतानाही सत्तेचा बहुतांश वाटा राष्ट्रवादीला दिला. याचीही नाराजी स्थानिक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आहे. हाच कित्ता आता ग्रामपंचायतीत गिरविला जात आहे. अशा पद्धतीने पक्षवाढ होणे शक्य नाही, असेही जाहीररीत्या बोलले जात आहे.
पिंपळगाव आणि वाघापूर या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या पॅनलमध्येच सरळ लढत होत आहे. लोहारा येथे त्या-त्या प्रभागातील प्रभावशाली नेत्याने प्रभागापुरते पॅनल उभे केले आहे. यात काँग्रेस, भाजपा या दोन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र पूर्ण ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र पॅनल येथे नाही. वडगाव या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला आठ जागा दिल्या आहेत. काँग्रेसने १४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवसेनेकडे मात्र मर्यादित जागांसाठीच उमेदवार आहेत. भोसा येथे नवीनच समीकरण तयार झाले असून भाजपा-राष्ट्रवादी आणि काँग्रेस-शिवसेना अशी युती झाली आहे. येथे राष्ट्रवादीने भाजपाला तीन तर काँग्रेसनेही शिवसेनेला तीन जागा दिल्या आहेत. निवडणूक लढण्यापुरते तयार झालेले हे समीकरण प्रत्यक्ष सरपंच निवडीच्या वेळी बदलण्याचीही शक्यता आहे. मात्र, भाजपाने स्वत:चे स्वतंत्र पॅनल कोठेच उभे केले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Even in the Gram Panchayat elections, NCP's candidate from DAVPANI,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.