झाडगावात होते घरोघरी गौरीची स्थापना
By Admin | Updated: September 9, 2016 02:40 IST2016-09-09T02:40:48+5:302016-09-09T02:40:48+5:30
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते.

झाडगावात होते घरोघरी गौरीची स्थापना
महालक्ष्मीचे गाव : प्रत्येक घरी तीन दिवस असते पाहुण्यांची मांदियाळी
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते. प्रत्येक घरी पाहुण्यांची रेलचेल असते.
झाडगाव हे जेमतेम चार हजार लोकवस्तीच गावं. गावात जवळपास साडेसातशे घराची वस्ती. मात्र त्यापैकी तब्बल ३०० च्यावर घरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते, हेच या गावाचे वैशिष्ट्य. दर एका घराआड या गावात गौरींची विधीवत स्थापना केली जाते. विशेष म्हणजे एकच आडनाव असलेल्या अनेक घरी गौरींची स्थापना केली जाते. गौरी स्थापना, पूजन आणि गौरी विसर्जन, या तीन दिवस गावात अक्षरश: जत्रा असते. घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. ज्यांच्या घरी महालक्ष्मींची स्थापना होत नाही, त्यांच्या घरच्या लेकी-सुनांसह आप्तस्वकीयही यावेळी गावात पोहोचतात.
तीन दिवस गावात पाहुण्यांची रेलचेल असते. या गावातील व्यक्ती राज्यात, देशात कुठेही राहात असेल, तर ती व्यक्ती या सणाला गावात परत येते. एकवेळ दिवाळीला कुणी गावाकडे फिरकणार नाही, मात्र गौरी पूजनाला सर्वांची पावले आपोआप माघारी फिरतात. ग्रामस्थांचे आप्तेष्ट, मित्र यांचीही गावात वर्दळ असते. गौरी जेवणाच्या दिवशी तर गावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावात जेवणासाठी माणूस मिळणेही कठीण होते. एका-एका व्यक्तीला चार-चार घरचे आवतन असते. तरीही प्रसाद म्हणून ‘आंबील’ ग्रहण करण्यासाठी चढाओढ सुरू असते.
गेल्या कित्येक वर्षांपासून झाडगावात थाटात गौरींची आगमन होते. दुसऱ्या पूजन आणि तिसऱ्या दिवशी विजर्सन होते. गावात विविध धर्मीयांचे वास्तव्य आहे. मात्र आजपर्यंत या सणाला कधीही गालबोट लागले नाही. एकोप्याने हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे मुस्लीम समाजातील वृद्ध महिला बांगड्यांचा व्यवसाय करते. त्या वृद्धेच्या कोऱ्या बांगड्या अनेक घरांतील महालक्ष्मींच्या हातात घातल्या जातात.
एकूणच अत्यंत आनंदाने आणि एकमेकांच्या भावना जोपासात सर्वधर्मीय बांधव हा गौरी उत्सव साजरा करतात. त्यातून गावात सामाजिक सलोखा कायम राहण्यास सैदव मदत होत आहे. (शहर प्रतिनिधी)
तीन दिवस दिवाळीचे
झाडगावात गौरी पूजनाच्या तीन दिवसांत दिवाळीचा भास होतो. एकवेळ दिवाळीला गावात एवढी गर्दी आणि रेलचेल दिसणार नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यात व जिल्ह्यातही झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. अनेक घरी तर केल्या १५0 वर्षांपासून व त्यापूर्वीपासूनही गौरींचे स्थापना केली जात आहे. त्यामुळेच गौरी पूजनाला या गावात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या आधुनिक आणि विज्ञानवादी युगातही या गावात हा धार्मिक सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे.