जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कार्यशैलीने शिवसैनिकांत उत्साह
By Admin | Updated: April 8, 2015 02:11 IST2015-04-08T02:11:41+5:302015-04-08T02:11:41+5:30
शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्या सामान्य कार्यशैलीने जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कार्यशैलीने शिवसैनिकांत उत्साह
यवतमाळ : शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्या सामान्य कार्यशैलीने जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख पद यापूर्वी मुंबई बाहेरील नेत्याकडे होते. या नेत्याच्या ताठर भूमिकेमुळे शिवसैनिक दुखावले जात होते. जिल्हास्तरावरील प्रमुख दोन-चार पदाधिकाऱ्यांच्या गोतावळ्यात राहण्याच्या सवईमुळे सामान्य शिवसैनिकांना या नेत्यापासून चार हात दूरच रहावे लागत होते. पाया पडणाऱ्या शिवसैनिकांना या नेत्याचा शाब्दीक मार सहन करावा लागत होता. सामान्य शिवसैनिकाला स्थानिक नेत्यांना टाळून थेट संपर्क प्रमुखाकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याची मूभा नव्हती. कारण हे नेते चौकडीच्या बाहेर निघतच नव्हते. सामान्य शिवसैनिकांत ते कधी मिसळल्याचे तर कुणाच्याही स्मरणात नाही. शिवसेनेचे जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी मात्र या परंपरेला फाटा दिला आहे.
रविवारी जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा येथे घेण्यात आला. नेरूरकर या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण होते. विशेष असे त्यांनी आपल्या कार्यशैलीने शिवसैनिकांना आकर्षितही करून घेतले. प्रमुख नेत्यांना बाजूला सारत ते सामान्य शिवसैनिकांमध्ये मिसळले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांच्यासोबत बसून चहा घेतला. वरिष्ठ नेत्याच्या वागणुकीचा हा आगळावेगळा अनुभव शिवसैनिकांनी घेतला. मी कुणाला पदावरून काढायसाठी आलो नाही, पक्षाचा कार्यक्रम घेऊन आलो आहे. मात्र जो पक्षाला साथ देणार नाही, पक्ष वाढविणार नाही, त्याला निश्चित बाद केले जाईल, असा संदेश नेरूरकर यांनी शिवसैनिकांना दिला. त्यांची ही स्टाईल सामान्य कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक वाटली, तशा प्रतिक्रियाही शिवसैनिकांमधून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे शिवसैनिकातील उत्साह वाढल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर काम करताना नेत्यांची अशी सामान्य वागणूक फारच कमी अनुभवायला मिळत असल्याचा सूरही मेळाव्यात ऐकायला मिळाला. (जिल्हा प्रतिनिधी)