स्वत:ला ‘शॉक’ बसताच अभियंते उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: May 9, 2015 00:02 IST2015-05-09T00:02:21+5:302015-05-09T00:02:21+5:30
वीज वितरण कंपनीमध्ये माणसाला विजेचा शॉक देणारी कंपनी अशीच काहीशी धारणा सर्वसामान्य जनतेची झाली ....

स्वत:ला ‘शॉक’ बसताच अभियंते उतरले रस्त्यावर
यवतमाळ : वीज वितरण कंपनीमध्ये माणसाला विजेचा शॉक देणारी कंपनी अशीच काहीशी धारणा सर्वसामान्य जनतेची झाली आहे. कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनता वीज वितरणच्या कारभाराने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून शेतकरी आणि उद्योजकही हतबल दिसत आहे. सततचे भारनियमन, अवास्तव वीज बिल याचा तर आता कुणी विचारही करीत नाही. वीज वितरणच्या कारभाराचे किस्से माहीत नसेल असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण आपल्या तोऱ्यात असतात. ग्राहकांशी आपले काही देणे-घेणे लागत नाही. याच भूमिकेतून त्यांचा वावर असतो. अवास्तव आलेले वीज बिल कमी करण्यासाठी वारंवार उंबरठे झिजविण्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. शेतकऱ्यांचा तर संपूर्ण हंगामच वीज वितरणमुळे गारद होतो. रोहित्र जळाल्यानंतर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रथम वीज बिल भरुन घेतले जाते. त्यानंतर दोन ते तीन महिने रोहित्र बसवून दिले जात नाही. शेतकरी हा सर्व प्रकार निमूटपणे सहन करतो, कारण तो संघटित नाही. उलट एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली की, संघटित कर्मचारी एकत्र येऊन कारवाईचा डाव हाणून पाडतात.
गडचिरोली पेक्षाही यवतमाळची वीज वितरण व्यवस्था भीषण असल्याची कबूली खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी २ मे रोजी यवतमाळच्या आढावा बैठकीत दिली होती. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यापुढे काही खरे नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला होता. याच बैठकीत चिमणाबागापूरच्या शेतकऱ्याचा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावेळी मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. परंतु कारवाई झाली नाही. दुर्दैवाने अमरलाल मनिहार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारवाई झाली. मात्र आता हीच कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी एकत्र आले आहे. सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले नसेल. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी कधी एकत्र आले नसतील. मात्र आपल्या अधिकाऱ्याचे निलंबन होताच जळफळाट होऊन सर्वच एकत्र आले. या अधिकारी-कर्मचाऱ्यातही शेतकरी पूत्र असतील. त्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीच जाणीव असेल. खासगीत त्यांचे मत वेगळेही असतील. परंतु वरिष्ठच शहीद झाल्याने आपलाही नंबर लागू शकतो, या भीतीने ही मंडळी संघटित होऊन त्याला विरोध करीत असावी. (नगर प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनो, मानवतेला जागा हो !
शासकीय सेवेत असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मानवतेला जागण्याची अपेक्षा आहे. सामान्य नागरिकांच्या सोईसुविधा, सेवेसाठी या यंत्रणेला नियुक्त केले गेले आहे. त्याचा भरघोस मोबदला ही यंत्रणा घेत असताना त्यांच्या सेवेतून मात्र जनतेला मोबदला मिळत नाही. शासकीय यंत्रणेत सेवारत असलेल्या या मानवांकडून जनतेतील मानवी कल्याणाची अपेक्षा ठेवली जात आहे.