अभियंत्यांच्या ‘मिलीभगत’चा वीज ग्राहकांनाच नव्हे कर्मचाऱ्यांनाही फटका
By Admin | Updated: February 19, 2015 00:05 IST2015-02-19T00:05:52+5:302015-02-19T00:05:52+5:30
फोटो रिडींग प्रणालीचा फज्जा उडून अनेक ग्राहकांना हजारो रुपयांचे बिल आले. आता ते ग्राहक ओरडत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात येत आहेत.

अभियंत्यांच्या ‘मिलीभगत’चा वीज ग्राहकांनाच नव्हे कर्मचाऱ्यांनाही फटका
यवतमाळ : फोटो रिडींग प्रणालीचा फज्जा उडून अनेक ग्राहकांना हजारो रुपयांचे बिल आले. आता ते ग्राहक ओरडत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात येत आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सामोरे जावे लागते. अनेकदा तर संतप्त ग्राहक धक्काबुक्कीपर्यंत येवून ठेपतात. अर्थात त्याला जबाबदारही वीज वितरण कंपनीचे प्रशासनच आहे. अभियंत्यांच्या मिलीभगतमधून उद्भवलेल्या या प्रसंगांना कर्मचाऱ्यांनाच नाहक सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी वीज वितरण कंपनीचीच मिटर रिडिंग घेणारी यंत्रणा होती. त्यासाठी मिटर वाचक नेमण्यात आले होते. त्यावेळी सुरळीत बिले मिळायची. रिडींग घेतानाही अनागोंदी होत नव्हती. आता त्यांची जागा कंत्राटदारांनी घेतली आहे. मात्र कंत्राटदारांकडून योग्य पद्धतीने मिटर रिडींग घेतल्या गेले नाही. त्यामुळे डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीतील उर्वरित युनीट आताच्या वीज देयकांमध्ये लागून आले आहे. त्यामुळे युनीटच्या दरातही वाढ झाली आहे. पर्यायाने शेकडो रूपयांची देयके हजारोंच्या घरात पोहोचली आहे. ही देयके पाहून ग्राहकांचे डोळेच पांढरे होतात. त्यामुळे एवढे मोठे देयक कसे याचा जाब विचारणे त्यांचा अधिकार आहे, तेव्हा आपल्याला प्रत्येक महिन्यातच एकूण वीज वापरापैकी कमी युनीटचे देयक आल्याचे सांगितले जाते. तसेच आता सर्व युनीट एकावेळी लागले असल्याने एवढ्या मोठ्या रकमेचे देयक आल्याचे सांगितले जाते. तेव्हा ही चूक कुणाची असा प्रश्न सहाजिकच ग्राहक उपस्थित करतो. कंत्राटदार तुमचे भुर्दंड आम्हाला का, असा प्रश्न उपस्थित करून देयक कमी करण्यासाठी ग्राहक वीज कर्मचाऱ्यांच्या अंगावर चालून जात आहे. अनेकदा वाद विकोपाला जावून भांडणे होतात. मात्र एकही वरिष्ठ अभियंता या ग्राहकांना सामोरे जायला तयार नाही. त्यांची समजूत घालायला तयार नाही. कर्मचाऱ्यांनाच हे सोपस्कार पार पाडावे लागत आहे. अभियंत्यांनी मर्जीतील कंत्राटदारांना फोटो रिडींग आणि वीज देयक वितरणाचे कंत्राट दिले. त्यांच्या मिलीभगतीचा फटका ग्राहकांनाच नव्हे तर आता वीज कर्मचाऱ्यांनाही बसत असल्याचे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनीच सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
धक्काबुक्कीच्या घटनांमध्ये वाढ
अव्वाच्या सव्वा रकमेची देयके आल्याने वीज ग्राहक संतप्त आहे. त्यातच थकबाकी असलेल्या ग्राहकांकडे कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा खंडित करण्यासाठी पाठविले जात आहे. त्यांच्यासोबत कुठलीही सुरक्षा नसते. वीज वितरण कंपनीची चूक असताना ती दुरुस्त न करता पुरवठा खंडित करण्यासाठी आल्याच्या कारणांवरून अनेकदा ग्राहक संतप्त होतात. यावेळी दोष नसलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेकदा अश्लील शिवीगाळीसह धक्काबुक्कीच्या घटना घडत आहे. काहींच्या पोलीस तक्रारीही झाल्या आहे.
नव्या कंत्राटदाराची प्रतीक्षा
दोन वर्षांपूर्वी फोटो रिडींग आणि वीज देयके वितरणाचे कंत्राट रेनबो कंपनीकडे होते. मात्र कमिशनच्या वादातून आणि कामातील अनागोंदीवरून मतभेद झाल्याने हे कंत्राट थांबविण्यात आले. त्यानंतर कमिशनखोरीतून मर्जीतील चार ते पाच स्थानिक कंत्राटदारांना ही कामे एक लाखांप्रमाणे विभागून दिली गेली. त्यांनीही त्यात अनागोंदीच केली. परिणामी रेनबो कंपनीपेक्षा स्थानिक कंत्राटदारांचा कामात अनागोंदी असल्याचे पुढे आले. त्यामुळे ग्राहकांचा रोष नियंत्रित व्हावा यासाठी तत्काळ नवा कंत्राटदार नेमावा, अशी मागणी आता वीज कर्मचाऱ्यातूनच पुढे येत आहे. नव्हे तर नागपूरच्या एका कंपनीला हे काम देण्याचा निर्णयही झाला आहे. त्या कंत्राटदार कंपनीची प्रतीक्षा वीज कर्मचाऱ्यांना लागली आहे.