विजेचा लपंडाव : भारनियमन, कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्तमारेगाव : विद्युत पुरवठा नियमित सुरू राहावा, वीज समस्या कायमस्वरूपी सुटाव्या, यासाठी आंदोलने करून मोर्चे काढून, कार्यालयाची तोडफोड करूनही येथे कार्यरत अभियंत्यांना जाग येत नाही. त्यांना शिविगाळ केल्याशिवाय निद्रीस्थ अभियंत्यांनाच नव्हे तर वरिष्ठांनासुध्दा जाग येत नाही, असा प्रत्यय नागरिकांना येऊ लागला आहे. वीज समस्यांबाबत आत्तापर्यंत अनेकदा ग्राहकांनी शांततेने निवेदने देऊन, विनंती करूनही काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील वीज ग्राहक प्रचंड त्रस्त झाले आहे. त्यांनी आता पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी काही अनुचित घटना घडल्यास उलट आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे लावले जातात व अधिकारी मोकळे राहतात. मात्र वरिष्ठ अधिकारी आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेत नाही आणि वीज समस्या सुटतच नाही. बोंबा मारून-मारून अखेर सर्व शांत होतात. असाच येथील संबंधित अभियंत्याचा समज झाला असावा, असे निदर्शनास येत आहे.मारेगाव महावितरणअंतर्गत मारेगाववरून कुंभा फिडरवरील १३ गावांना वीज पुरवठा केला जातो. याच फिडरवरून वेगाव परिसरातील गावांनासुध्दा अतिरिक्त वीज पुरवठा केला जातो. तथापि जंगलातील झाडाझुडूपातून जाणारी वीज वाहिनी सुरळीत राहावी, म्हणून मान्सूनपूर्व ट्री कटींगसह केल्या जाणाऱ्या कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. परिणामी वीज वाहिन्यांच्या लोंबकाळणाऱ्या तारा, वाकलेले वीज खांब, रोहित्रांची देखभाल, रोहित्रांवरील अतिरिक्त भार, या विविध कारणांने कुंभा परिसरात वीज पुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.नादुरूस्त किंवा जळालेली रोहित्रे बदलविण्यास महावितरणकडून कमालीचा विलंब केला जातो. वीज ग्राहक, नागरिक नेहमीच आपल्या वीज समस्या महावितरण कंपनी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, विनंती करून, कधी हातपाय जोडून सांगतात. मात्र त्यांना आश्वासना पलीकडे कोणतीच कामे होताना दिसत नाही. पदाधिकारी, नेते, पुढारी, कार्यकर्त्यांना परिसरातील वीज समस्या माहिती असूनही अभियंत्याच्या चालढकलपणामुळे तेसुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते. या परिसरासाठी कार्यरत वीज कर्मचारीसुध्दा आता दररोजच्या तक्रारीने वैतागले आहेत.कुंभा फिडरवर दररोज नऊ तासांचे वेळी-अवेळी भारनियमन सुरू आहे. त्यातच इतर वेळी होणारा वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाचा होत असल्याने शेतकरी सिंचन करू शकत नाही. घरगुती मोटारीही चालत नाही. पाणी पुरवठा योजना प्रभावित होतात. परिणामी गावागावांत पाणी समस्या निर्माण झाली आहे. विजेचा लपंडाव आणि कमी-जास्त दाबाने विजेवर चालणारी घरगुती उपकरणे निकामी होत आहेत. पिठ गीरणी चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भारनियमन करा, पण इतर वेळी होणारा वीज पुरवठा पूर्ण दाबाचा द्या, विजेचा लपंडाव थांबवा, वीज लपंडावाची कारणे शोधा, अभियंता वसुले साहेब वसुली करा, पण पूर्ण वेळ वीज द्या, अशी म्हणण्याची वेळ वीज ग्राहक व शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र महावितरण उपाययोजना करण्यास सतत चालढकलच करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अभियंत्याचा भोंगळ कारभार
By admin | Updated: November 10, 2014 22:51 IST