बदली होऊनही अभियंत्यांना महागावमध्येच ‘इंटरेस्ट’

By Admin | Updated: June 14, 2015 02:50 IST2015-06-14T02:50:31+5:302015-06-14T02:50:31+5:30

तालुक्यातील विविध विकास कामांवर सध्या बदली झालेलेच अभियंते राबताना दिसत असून कोट्यवधीच्या या कामांचा मोह त्यांना अद्यापही सुटला नाही.

Engineer 'interest' in Mahagaon | बदली होऊनही अभियंत्यांना महागावमध्येच ‘इंटरेस्ट’

बदली होऊनही अभियंत्यांना महागावमध्येच ‘इंटरेस्ट’

महागाव : तालुक्यातील विविध विकास कामांवर सध्या बदली झालेलेच अभियंते राबताना दिसत असून कोट्यवधीच्या या कामांचा मोह त्यांना अद्यापही सुटला नाही. वरिष्ठांचाही त्यांच्यावर कोणता वचक दिसत नसून यातून विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महागाव उपविभागात २५ कोटींची कामे सुरू आहे. त्यात रस्ते, पूल, इमारत, अंतर्गत सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. यातील सुमारे १५ कोटी रुपयांची कामे बदली झालेले अभियंतेच करीत आहे. कनिष्ठ अभियंता पी.एस. दुधे यांची दीड वर्षांपूर्वी उमरखेड येथे बदली झाली. परंतु वरिष्ठांच्या वरदहस्ताने ते महागावमध्येच ठिय्या देवून होते. १२ वर्षे महागावात काढल्यानंतरही बदलीच्या ठिकाणी जाण्यास उत्सूक नव्हते. अशातच १ एप्रिल रोजी त्यांची पुन्हा उमरखेड येथे रुजू होण्याचे आदेश आले. परंतु आजही ते महागाव उपविभागातच कामे करताना दिसत आहे. शिरपुल्ली-फुलसावंगी या दीड किलोमीटर रस्त्याचे दीड कोटीचे काम फुलसावंगी-चिखली-किनवट या तीन किलोमीटर रस्त्याचे अडीच कोटीचे काम आणि महागाव शहरातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे १० कोटीचे काम त्यांच्याकडेच दिसत आहे. एमबी तयार करून बिलेही टाकत आहे. कोणताही अधिकार नसताना ही कामे सुरू आहे.
डी.डी. चिंचोले हे दुसरे कनिष्ठ अभियंता. त्यांचे १५ दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे बदली झाले. मात्र आजही त्यांचा महागाव तालुक्याचा मोह सुटत नाही. गुंज, खडका, लेवा, पोखरी, तिवरंग, बारभाई तांडा, पोहंडूळ येथील सात कोटींची कामे तेच सांभाळत आहे. तर जुगल राठोड हे पुसद येथे रुजू झाल्यानंतरही काळी पॅकेटमधील कामे पाहात आहे. दोन कोटी रुपयांची ही कामे त्यांच्याच देखरेखीखाली होत आहे.
बदली झाल्यानंतरही या कनिष्ठ अभियंत्यांना आपल्या कामाचा मोह का सुटत नाही, यातच खरे गौडबंगाल आहे. महागाव येथे असलेल्या अनिल खंदारे यांच्याकडे सध्या सात कोटीची कामे सुरू आहे. इतर कामे बदली झालेले अभियंतेच करीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त नसल्याने या कामात मोठ्या
प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.
महागावचे उपअभियंता तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांचे तालुक्यातील कामांकडे पाहिजे तसे लक्ष दिसत नाही. या सर्व प्रकारात महागाव तालुक्यातील कामांची गुणवत्ता ढासळत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
महागाव उपविभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. शासकीय नियमानुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य बांधकामासाठी वापरले जात असल्याची नेहमीच ओरड होते. कोणताही अभियंता कामावर प्रत्यक्ष हजर राहत नाही. कंत्राटदारच आपल्य मनमर्जीने काम करतो. विशेष म्हणजे पावसाळ््याच्या तोंडावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची गुणवत्ता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. गुणवत्तेकडे लक्ष देण्याऐवजी बदली झालेले कनिष्ठ अभियंते केवळ बील काढण्यातच दंग असल्याचे दिसते.

Web Title: Engineer 'interest' in Mahagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.