अभियंत्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: March 20, 2015 02:06 IST2015-03-20T02:06:32+5:302015-03-20T02:06:32+5:30
रोहयोअंतर्गत खोदलेल्या विहिरीची एमबी मंजूर करून पंचायत समितीतून मस्टर काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना ...

अभियंत्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
उमरखेड : रोहयोअंतर्गत खोदलेल्या विहिरीची एमबी मंजूर करून पंचायत समितीतून मस्टर काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना येथील पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यासह ग्रामसेवक आणि एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई येथील हुतात्मा स्मारक गार्डनसमोर गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
कनिष्ठ अभियंता नितेश सुभाष तगडपल्लेवार, ग्रामसेवक डी.ए.मस्के आणि दलाल विशाल सुभाष देवकर असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपींची नावे आहे. शेतात रोहयोअंतर्गत एका शेतकऱ्याला एक लाख ९० हजार रुपये किंमतीची विहीर मंजूर झाली. विहिरीचे खोदकाम व बांधकामासंबंधी पंचायत समितीतून एमबी मंजूर करणे व मस्टर काढावे लागते. त्यानंतर कामाचे पैसे लाभार्थ्यांना दिले जाते. यासाठी संबंधित शेतकऱ्याने कनिष्ठ अभियंता तगडपल्लेवार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच जेवलीचे ग्रामसेवक मस्के यांनी मंजूर झालेल्या विहिरीचे पैसे काढून देण्यासाठी १९ हजार रुपयांची मागणी केली. तर विशाल देवकर हा या दोघांचा मध्यस्थ होता. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर गुरुवारी उमरखेड येथे सापळा रचून तगडपल्लेवार यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)