अभियंत्याकडे ८२ लाखांची अपसंपदा
By Admin | Updated: October 11, 2014 23:13 IST2014-10-11T23:13:55+5:302014-10-11T23:13:55+5:30
सुमारे ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याला अटक करण्यात आली. तसेच वाममार्गाने

अभियंत्याकडे ८२ लाखांची अपसंपदा
‘एसीबी’ची कारवाई : पत्नीलाही अटक
यवतमाळ : सुमारे ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याला अटक करण्यात आली. तसेच वाममार्गाने संपत्ती गोळा करतानना प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवीत त्याच्या पत्नीविरूध्दही गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
दिनेशकुमार दौलतराव तायवाडे (६८) रा. शिवाजीनगर यवतमाळ असे बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी अटक केलेल्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंत्याचे तर माधुरी दिनेशकुमार तायवाडे (५९) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. सेवानिवृत्तीपूर्वी दिनेशकुमार तायवाडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती मंडळात कार्यरत होते. या काळात त्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत लाखोंची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. तक्रारकर्त्याने नमूद केलेल्या मालमत्तेची लाचलुचपत विभागाने बारकाईने चौकशी केली. त्यामध्ये अभियंता तायवाडे यांच्याकडे तब्बल ८२ लाख ७२ हजार ३६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. लाचलुचपत विभागाने ही मालमत्ता सील केली असून अभियंता तायवाडे आणि त्यांची पत्नी माधुरी या दोघांविरूध्द वडगाव रोड पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या १३(१)(ई), १३(२) आणि भादंवि १०९ कलमान्वये गुन्हा नोंदविला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली. कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक एस. एन. जामकर, नितीन लेव्हलकर, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, अमोल महल्ले, अरूण गिरी, शैलेश ढोणे, अमीत जोशी, निलेश पखाले, अनील राजकुमार, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर यांनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)