आशुतोष राठोडच्या खुनाचा तपास अखेर सीआयडीकडे
By Admin | Updated: April 1, 2016 02:47 IST2016-04-01T02:47:47+5:302016-04-01T02:47:47+5:30
दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास बुधवारी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या यवतमाळ शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

आशुतोष राठोडच्या खुनाचा तपास अखेर सीआयडीकडे
दारव्हा येथील खून : २० लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच केला होता घात
यवतमाळ : दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास बुधवारी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या यवतमाळ शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कागदपत्रे पुढील तपासासाठी ताब्यात घेतली.
दारव्हा येथील चिंतामणी मंदिरानजीकच्या कालव्याच्या पुलाखाली आशुतोष राठोड (२१) रा. दारव्हा या युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला होता. आशुतोष हा दारव्हा येथील मुंगसाजी महाविद्यालयाचा बीएस्सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी अक्षय सुरेश तिरमारे (१९) रा. उत्तरेश्वर चौक, दारव्हा व सौरभ प्रकाश दुर्गे (१८) राहुल अरुण मदनकर (२०) दोघे रा. तरोडा ता. दारव्हा या तिघांना अटक केली होती. दरम्यान गोर सेनेने या प्रकरणी जिल्हाभर आंदोलन करून हा तपास सीआयडीला सोपविण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणी विविध स्तरावर निवेदनेही सादर करण्यात आली होती. अखेर या मागणीची दखल घेत आशुतोषच्या खुनाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. आशुतोषच्या खुनामागील नेमके कारण काय, त्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, पडद्यामागे काही सूत्रे हलविली गेली का आदी बाबींचा उलगडा करण्याचे आव्हान सीआयडीपुढे आहे. मित्र असलेल्या आरोपींनी आशुतोषच्या वडिलांकडून सुमारे २० लाखांची खंडणी उकळण्यासाठी खुनाचा हा कट रचला होता.
खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह जाळण्यात आला होता, अशी माहिती दारव्हा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली होती. सीआयडीचे पोलीस निरीक्षक एस.टी. खाटपे या प्रकरणाचा तपास करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)