संचालक नियुक्तीच्या घोळात अखेर प्रशासकाला बसविले
By Admin | Updated: August 17, 2014 23:26 IST2014-08-17T23:26:40+5:302014-08-17T23:26:40+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि

संचालक नियुक्तीच्या घोळात अखेर प्रशासकाला बसविले
नेर : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्याने संचालक नियुक्तीसाठी याद्यांवर याद्या पडल्याने अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच तालुक्यात असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. बाजार समितीवर वर्चस्वाच्या लढाईत मात्र विकासाचे तीनतेरा वाजले आहे. आता प्रशासक म्हणून सहायक निबंधक सुनील भालेराव यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
सभापतींचा कार्यकाळ ४ आॅगस्ट २०१४ रोजी संपला. यानंतर प्रशासकीय संचालक नियुक्तीसाठी काँग्रेस, राकाँ, शिवसेना या पक्षांची गर्दी वाढली. सुरुवातीला काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी सल्लामसलत करून काँग्रेसचे नऊ आणि राकाँचे सहा अशा एकूण १५ जणांच्या नावांची यादी सादर केली. ही यादी कुठल्याही परिस्थितीत मंजूर होईल, असे सांगितले जात होते. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही यादी सादर केली. या प्रकारातूनच ठाकरे आणि देशमुख यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले.
दरम्यान, खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी सहायक निबंधकांना पत्र पाठवून काँग्रेस-राकाँने सुचविलेली नावे सक्षम प्रशासन देवू शकत नाही, असे सांगत प्रशासक बनवूच नये असे म्हटले. शिवाय त्यांची स्वतंत्र यादी सादर केली. काँग्रेस-राकाँ, संजय देशमुख आणि सेनेची तिसरी यादी पडताळणीसाठी जमा झाली. यावर कुठलाही निर्णय होत नसतानाच राष्ट्रवादीने पुन्हा दहा नावांची यादी सादर केली.
याद्यांच्या या घोळात प्रशासन अडचणीत सापडले. नेमका निर्णय देण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अखेर या बाजार समितीवर प्रशासक म्हणून सुनील भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली.
सुरुवातीला माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राकाँ अशी १५ नावांची यादी सादर केली होती. यानंतरही अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावांची यादी कशी सादर केली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ वर्चस्वासाठी हा घोळ घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र बाजार समितीचा विकास थांबला याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ यांना विचारले असता ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राकाँसह १५ नावांची यादी सादर केल्यानंतर संजय देशमुख यांनी चार नावांची यादी पाठविली. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक यांनी पुन्हा दहा नावे पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)