दाभा येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती
By Admin | Updated: September 26, 2016 02:42 IST2016-09-26T02:42:11+5:302016-09-26T02:42:11+5:30
सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली.

दाभा येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती
एकात्मतेचे प्रतीक : विविध कार्यक्रमांची रेलचेल, भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग, युवकांचे लोटांगण
दाभा(पहूर) : सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली. ८९ वर्षांपासून ही दिंडी काढली जात आहे. बग्गी जावराचे श्री संत रामजी महाराज यांनी महामारीच्या काळात १९२७ साली आषाढ कृष्ण बारस या दिवसापासून ४० दिवसांची दिंडी सुरू करायला लावली. संत रामजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे यादवराव परोपटे यांनी एकट्याने ही दिंडी सुरू केली. आज ही दिंडी संपूर्ण गावाची दिंडी आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडी निघाली. यात पालखी, वारकरी, भजन मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, शंकरराव शेंडे व रंजन ठवकर यांची अवधुती भजन मंडळाची मांड, भोलेनाथ भजन मंडळ, आदिवासी भजन मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, श्री संत मोहन महाराज महिला भजनी मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.
दिंडीसोबत योगेश फाळे, अवधुत ठवकर, अंकुश मुडे, रोशन वनवे, मंगेश सडसडे, अमोल बानते, संदीप बानते, सागर राऊत, युवराज भडके, मंगेश शेंडे, सुमित डायरे, आकाश गावंडे, सुनील बानते, अरविंद पंचबुद्धे, गोपाल भडके, अक्षय बानते, संतोष पोयाम, फकिरा वानखेडे, सागर पंचबुद्धे हे उघड्या अंगाने हात जोडून लोटांगण गेले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत मोहन महाराज मंदिर, राम मंदिर, संत बळीराम महाराज मठ, हनुमान मंदिर, संत मोहन महाराज तपोभूमी मंदिराच्या पायऱ्या लोटांगणाने चढले व उतरले. गावातील काही चौकात गजर व भारूडाच्या तालावर गोफ विणून उकलले. निखिल मेहत्रे, वृषभ अंजीकर, प्रवीण गांजरे, गोलू फाळे, सुरज बोकाडे, निखिल बाहुटे, कपिल घावडे, निखिल परोपटे, माधव अंजीकर, प्रमोद फाळे, सुनील अंजीकर, शालिग्राम कानतोडे, श्रावण परोपटे, आकाश लोखंडे आदी सहभागी झाले होते.
आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनीही दिंडीला भेट दिली. माजी मंत्री वसंत पुरके दिंडीत सहभागी झाले होते. या मान्यवरांचा मानाचे शेले, नारळ देऊन सन्मान करण्यात आला. दिंडीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यावर पारंपरिक आरत्या झाल्या. हभप गणेश महाराज येलकर यांच्या हस्ते काला वाटपानंतर दिंडीची समाप्ती झाली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी व ट्रस्टींनी भजन मंडळ आणि साधूसंतांचा मानाचे शेले व नारळ देऊन सन्मान केला. (वार्ताहर)