चोख पोलीस बंदोबस्त : काही व्यावसायिकांचे सहकार्य, तर काहींचा अडेलतट्टूपणा आर्णी : शहरातील मेनरोडवर गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. सदर मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, नगरपरिषद व पोलीस विभाग यांनी संयुक्त सहभाग घेतला. यावेळी काही व्यावसायिकांनी मोहिमेला सहकार्य केले, तर काहींनी मात्र अडेलतट्टूपणा केला. सकाळी मोहीम सुरू होताच अनेक व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वत:च काढायला सुरुवात केली. तर काही व्यावसायिकांनी पाहू वेळेवर म्हणत अतिक्रमण काढले नाही. अखेर त्या व्यावसायिकांचे अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. जेसीबी मशीनने सदर अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी पोलिसांनी अतिरिक्त पोलीससुद्धा बंदोबस्तासाठी बोलाविले. आर्णीत एकच मेन रोड असल्याने रस्त्याच्या दोनही बाजूने अतिक्रमण वाढले होते. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. मोहीम संपल्यानंतर शहरातील अतिक्रमण पुन्हा जैसे थे होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना आखावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मेनरोडवर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर दुसरे दुकान लावण्यात आले. यात भाजी, फळे, पाणीपुरी, आईस्क्रीमची दुकाने यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठे दुकानदार पैसे घेतात. त्यांना विद्युत पुरवठाही पुरवितात. अशा व्यापाऱ्यांवरसुद्धा कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य लोकांकडून पुढे येत आहे. या मोहिमेत तहसीलदार सुधीर पवार, नायब तहसीलदार यू.डी. तुंडलवार, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील चौधरी, ठाणेदार संजय खंदाडे आदी सहभागी होते. आर्णी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. शहरात एकमेव असलेल्या मेनरोडवरून वाहने काढणे अतिक्रमणामुळे कठीण झाले होते. गर्दीत अपघाताचे प्रमाणही वाढले होते. अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेत शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
आर्णीत अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 02:20 IST