अतिक्रमण हटावला अखेर सापडला मुहूर्त
By Admin | Updated: June 7, 2015 00:04 IST2015-06-07T00:04:14+5:302015-06-07T00:04:14+5:30
जत्रा मैदानावरील अतिक्रमण, शहरातील इतर अतिक्रमणाचे काय होणार याकडे लागले लक्ष....

अतिक्रमण हटावला अखेर सापडला मुहूर्त
जाहीर सूचना : जत्रा मैदानावरील अतिक्रमण, शहरातील इतर अतिक्रमणाचे काय होणार याकडे लागले लक्ष
वणी : येथील जत्रा मैदानावर व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असून त्याकडे नगपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ५ जूनच्या अंकात प्रकाशित केले होते. या अतिक्रमणामुळे नगरपरिषदेची कोट्यवधींची मालमत्ता अतिक्रमणधारकांच्या घशात जात आहे. आता या अतिक्रमणाला हटविण्यासाठी नगरपरिषदेला एकदाचा मुहूर्त सापडला असून येत्या १0 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
येथील नगरपरिषदेला तत्कालीन ब्रिटीश सरकारने २ जुलै १९३३ रोजी ७४ एकर जागा हस्तांतरीत केली होती. साप्ताहिक बाजार, बैल बाजार व अन्य सामाजिक, सार्वजनिक कामासाठी ही जागा उपयोगात आणावयाची होती. तथापि या जागेकडे नगरपरिषदेचे सतत दुर्लक्ष झाले. परिणामी काहींनी तेथे अतिक्रमण करून दुकान, घरे थाटली. त्यामुळे ७४ एकरापैकी केवळ ३० एकर जागाच आता शिल्लक दिसत आहे. तत्कालीन ब्रिटीश शासनाने दिलेली ही जागा कुणालाही विकता येत नाही. ती कुणाला हस्तांतरीतही करता येत नाही.
या सर्व जागेचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ३२ लाख ७३ हजार ३९८ चौरस फूट असून ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे या खुल्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले. त्यांनी तेथे आपली दुकाने, घरे थाटली. नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्षच केले. त्यामुळे दिवसेंदिवस या या जागेवर अतिक्रमणाचा सपाटा सुरूच आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या जागेत आता चिकन, मटन विक्रेते, इतर उद्योग, टाल उद्योग, भंगाराची दुकाने दिसून येत आहे. या अतिक्रमणामुळे आता आठवडी बाजारही रस्त्यावरच भरतो. अनेकांना रस्त्यावरच आपली दुकाने थाटावी लागतात. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आता नगरपरिषद खडबडून जागी झाली आहे. आता अतिक्रमण हटावला मुहूर्त सापडल्याने ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे. सोबतच शहरातील इतरही अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
लिलाव करण्याची दिली नोटीस
नगरपरिषदेने ‘लोकमत’च्या वृत्तानंतर आरक्षण क्रमांक ७८ व ६६ वरील जत्रा मैदान, आठवडी बाजार परिसर, गोकुलनगर तलावाच्या जागेवरील तसेच दसरा मैदान परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणधारकांना जाहीर सूचना दिली आहे. या जाहीर सूचनेत संबंधित अतिक्रमण १0 जूनपासून हटविण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अन्यथा १0 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत हे अतिक्रमण कोणतीही सूचना न देता हटविण्यात येणार असल्याचे जाहीर सूचनेतून कळविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना कोणतीही नुकसान भरपाई न देता अतिक्रमणाचे सर्व साहित्य जप्त करून त्याचा जाहीर लिलाव करण्याची ताकीदही या जाहीर सूचनेतून देण्यात आली आहे.