अतिक्रमणधारकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: March 8, 2017 00:23 IST2017-03-08T00:23:11+5:302017-03-08T00:23:11+5:30

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाच्या पथकासमोर

Encroachment of suicide attempt | अतिक्रमणधारकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अतिक्रमणधारकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सावंगी येथील घटना : काही काळ तणाव, वन विभागाच्या पथकासमोरच घेतले विष
वणी : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाच्या पथकासमोर एका अतिक्रमणधारकाने विष प्राशन केले. मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथे घडलेल्या या घटनेने वन विभाग हादरून गेला आहे. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विष प्राशनामुळे प्रकृती गंभीर झाल्याने सदर अतिक्रमणधारक शेतकऱ्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
शंकर वामन नक्षिणे (४२) असे विष प्राशन करणाऱ्या अतिक्रमणधारक शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर नक्षिणेसह सावंगी (नवीन) गावातील अन्य चारजणांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. त्यावर पिकाचे उत्पादन घेऊन हे अतिक्रमणधारक कुटुंबाची गुजरान करीत आहेत. शंकर नक्षिणे याने सन २००२-०३ मध्ये चार एकर वन जमिनीवर अतिक्रमण केले होते. १३ डिसेंबर २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबाबतचा अधिनियम शासनाने २००६ मध्ये काढला होता. मात्र तरीही शंकर नक्षिणे याचे अतिक्रमण कायम करण्यात आले नव्हते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती भाकपचे अनिल घाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. असे असतानाही वन विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत नक्षिणेसह अन्य अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. ठरल्यानुसार मंगळवारी सकाळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आर.के.पटवारी हे ५० जणांच्या फौजफाट्यासह सावंगी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोहचले. तेथे पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचारीदेखील उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यासाठी सात जेसीबी मशीन आणण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होताच, शंकर नक्षिणे व अन्य अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, असे या अतिक्रमणधारकांनी वनअधिकाऱ्यांना टाहो फोडून सांगितले. मात्र वन अधिकाऱ्यांनी त्यांचे न ऐकता कारवाई आरंभली. त्यामुळे उद्वीग्न झालेल्या शंकरने वन अधिकाऱ्यांसमोर विष प्राशन केले. ही घटना घडत असताना कोणताही अधिकारी शंकरला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पुढे आला नाही. शंकरची प्रकृती गंभीर बनताच, त्याला वणी येथे आणण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Encroachment of suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.