जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा

By Admin | Updated: June 5, 2015 00:18 IST2015-06-05T00:18:45+5:302015-06-05T00:18:45+5:30

येथील जत्रा मैदानावर व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असून त्याकडे नगपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे.

Encroachment at Jatra field | जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा

जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा

आसीफ शेख वणी
येथील जत्रा मैदानावर व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असून त्याकडे नगपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेची कोट्यवधी रूपयांची मालमत्ता आता अतिक्रमणधारकांच्या घशात जाताना दिसत आहे.
येथील नगरपरिषदेला तत्कालीन ब्रिटीश सरकारने २ जुलै १९३३ रोजी तब्बल ७४ एकर जागा दिली होती. साप्ताहिक बाजार, बैल बाजार व अन्य सामाजिक, सार्वजनिक कामासाठी ही जागा नगरपरिषदेला देण्यात आली होती. मात्र गेल्या ८२ वर्षांच्या कालावधीत नगरपरिषदेने ही जागा सुरक्षित ठेवली नाही. त्यामुळे काही व्यावसायीकांनी तेथे अतिक्रमण करून आपले दुकान थाटले आहे. व्यावसायीकांनी जत्रा मैदानावर अतिक्रमण केल्यामुळे ७४ एकरापैकी आता केवळ ३० एकर जागाच शिल्लक दिसत आहे.
तत्कालीन शासनाने नगरपरिषदेला दिलेली ही ७४ एकर जागा कुणाला विकताही येत नाही. तसेच ती कुणाच्या नावाने हस्तांतरीतही करता येत नाही. या जागेचे क्षेत्रफळ जवळपास ३२ लाख ७३ हजार ३९८ चौरस फूट आहे. याच मैदानावर दरवर्षी विदर्भातील प्रसिद्ध रंगनाथ स्वामींची यात्रा भरते. त्याचे उत्पन्न नगरपरिषदेला मिळते. तथापि या जागेवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे नगरपरिषदेचे लक्षच जात नाही. गेल्या ८२ वर्षांपासून या जागेवर व्यावसायीकांनी हळूहळू अतिक्रमण करणे सुरूच ठेवले आहे. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढतच आहे. परिणामी उरलेली ३० एकर जागाही आता अतिक्रमणधारकांच्या घशात जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या जागेकडे अदिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. परिणामी तत्लाीन सरकारने ज्या प्रयोजनासाठी ही जागा दिली होती, तो उद्देश आता कागदावरच असल्याचे दिसून येते. या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायीकांना नगरपरिषदेतर्फे साधी नोटीसही देण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावत आहे. लगतच्या गोकुलनगरमधीलही काही नागरिक या जागेवर आता अतिक्रमण करीत आहे. त्याचबरोबर इस्लामपुरा, तलाव परिसराकडूनही अतिक्रमण वाढत चालले आहे.
या जागेवर बैलबाजार, दसरा उत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या शाळेतील खेळांचे सामनेही तेथे पार पडते. मात्र आता मैदानाच्या सभोवताल अतिक्रमण होत असल्याने भविष्यात लहान मुलांसाठी खेळण्याकरिताही ही जागा शिल्लक राहात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजाराची नियोजित जागा आहे, तेथे आता चिकन, मटन विक्रेते, इतर उद्योग, टाल उद्योग, भंगाराची दुकाने लागली आहेत. त्यामुळे आठवडी बाजार दीपक टॉकिज परिसरातील रस्त्यावरच भरतो. हा बाजार दीपक टॉकिज परिसरापासून, तर तलाव रोडपर्यंत भरतो. ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी नाईलाजाने भर रस्त्यावरच आपली दुकाने थाटतात. त्यांना दुकाने लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसते. दुसरीकडे अतिक्रमणधारक मोक्याची जागा बळकावून बसले आहेत. शेतकऱ्यांना जागा मिळत नसताना अतिक्रमणधारक खुशाल तेथे जागा बळकावून वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Encroachment at Jatra field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.