विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेत वनविभागाचे अतिक्रमण
By Admin | Updated: May 15, 2015 23:58 IST2015-05-15T23:58:28+5:302015-05-15T23:58:28+5:30
येथील सामाजिक न्याय विभागाच्या आवारात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिकेची इमारत ....

विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेत वनविभागाचे अतिक्रमण
दोन वर्षाचा करार संपला : सामाजिक न्याय विभागाकडून नोटीस
यवतमाळ : येथील सामाजिक न्याय विभागाच्या आवारात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिकेची इमारत उभारण्यात आली आहे. दरम्यान निधीअभावी पुढचे काम थांबल्याने या अभ्यासिकेची इमारत मुख्य वनसंरक्षक कार्यालयास भाडेपट्टीने दोन वर्षासाठी देण्यात आली. हा करार संपूणही वनविभागाने इमारत खाली केली नाही. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून सातत्याने नोटीस दिल्या जात आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका काढण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी दोन मजली टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे.
मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुरेपूर तयारी करता यावी या दृष्टिकोणातून ही योजना सामाजिक न्यायविभागाने कार्यान्वित केली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही.
सामाजिक न्यायविभागात उभारण्यात आलेली अभ्यासिकेची इमारत वनविभागाला कार्यालयासाठी दोन वर्षाकरिता भाड्याने देण्यात आली. हा करार आॅगस्ट २०१४ मध्येच संपुष्ठात आला. त्यानंतर सामजिक न्यायविभागाने इमारत खाली करण्यासाठी वनविभागाला सातत्याने नोटीस दिल्या आहेत. मुळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेची इमारत भाडेपट्टीने दिलीच कशी हा मुद्दा उपस्थित होतो.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेटची व्यवस्था आणि संगणक लॅब येथे असणे अपेक्षित आहे. मात्र निधीची सबब पुढे करून ही अभ्यासिकाच तयार करण्यात आली नाही. आता तर या अभ्यासिकेच्या इमारतीत वनविभागाने कार्यालय थाटले आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)