ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:46+5:30

विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उपजीविकेसाठी टपऱ्या उभ्या केल्या. मात्र अतिक्रमण विभागाने कोणतीही सूचना न देता थेट टपऱ्या नष्ट केल्या.

Encroachment eradication campaign in the rainy season | ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटाव मोहीम

ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटाव मोहीम

ठळक मुद्देटपऱ्या-पानठेले हटविले : आधीच लॉकडाऊन, त्यात उपजीविकेच्या साधनावर बुलडोजर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे आधीच शहरातील व्यवसाय ठप्प आहे. कुटुंबाची उपजीविका चालवावी कशी याची चिंता आहे. परंतु नगरपरिषदेने ऐन पावसाळा सुरू होताच शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. यात उपजीविकेचे साधनच नष्ट करण्यात आले. शुक्रवारी शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले पानठेले, चहा टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे हे व्यावसायिक आणखी अडचणीत सापडले आहे.
लॉकडाऊन काळात सर्व काही ठप्प होते. मात्र पालिकेने ऐन पावसाळ्यातच ही मोहीम हाती घेतली. विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उपजीविकेसाठी टपऱ्या उभ्या केल्या. मात्र अतिक्रमण विभागाने कोणतीही सूचना न देता थेट टपऱ्या नष्ट केल्या. सूचना असती तर व्यावसायिकांना आपल्या टपऱ्या हलविणे सहज शक्य झाले असते. पालिकेच्या या अतिरेकी कारवाईचा व्यावसायिकांकडून निषेध केला जात आहे. दुकाने बंद करून व्यावसायिक घरी गेले असताना हे अतिक्रमण काही भागात उचलले गेले. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे पुन्हा व्यवसाय सुरू करायचा कसा हे नवीन संकट उभे झाले आहे. रस्त्यावर नसलेले आतल्या भागातील अतिक्रमण-टपऱ्याही उचलल्या गेल्या. व्यावसायिकांवर अचानक हा अतिक्रमणाचा बुलडोजर चालविला गेल्याने यवतमाळ नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमधून बाहेर निघून कसे बसे उभे होण्याचा प्रयत्न करीत असताना पालिकेने त्यांचे पुन्हा कंबरडे मोडल्याचे चित्र आहे.

आम्हाला नुकसानभरपाई द्या, अतिक्रमणधारकांची मागणी
व्यावसायिकांवर शुक्रवारी अतिक्रमणाचे नवे संकट ओढावले. यामुळे त्यांच्या हातातला संपूर्ण रोजगार उद्ध्वस्त झाला आहे. आता जगायचे कसे, कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नुकसानभरपाई मिळावी आणि पथकातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे. या अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मागण्यांचे निवेदन देऊन व्यथा मांडण्यात आली. यावेळी उमेश करोडे, अरुण जमनारे, संदीप गवई, महादेव वानखेडे, वंदना खैरकार, वेणू नेवरे, प्रीती गवई, प्रमोद निपाने, अशोक लोखंडे, विलास आडे, अनिल करोडदेव, राम इरवे, कल्पना साठवणकर, कल्पना कडू, राजेंद्र लोहटे, अरविंद खंदाडे, दीपक भाकरे, देवानंद मानकर, भारत वंजारी आदी व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title: Encroachment eradication campaign in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.