रिकाम्या सरकारी इमारती बनल्या गैरप्रकाराचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:18 IST2018-03-28T23:18:10+5:302018-03-28T23:18:10+5:30
लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे.

रिकाम्या सरकारी इमारती बनल्या गैरप्रकाराचे अड्डे
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे. संध्याकाळनंतर त्याठिकाणी चालत असलेले प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाय शांतता व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांसाठी रान मोकळे झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतींचा वापर संबंधितांकडून केला जात नाही. पंचायत समितीजवळ जुने शासकीय रुग्णालय होते. दहा वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. यानंतर काही वर्षेपर्यंत प्रसूती याशिवाय इतर रुग्णालयीन कामे या इमारतीमधून चालत होती. आता बेवारस पडून असलेली ही इमारत काही लोकांनी मौजमजेसाठी वापरणे सुरू केले आहे. काही प्रकरणात कारवाईसुद्धा पोलिसांकडून झाली आहे. इमारतीला दारे, खिडक्या असल्या तरी त्या लाऊन घेण्याची तसदी संबंधित प्रशासनाने कधीही घेतली नाही.
अमरावती मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसाठी बांधलेले निवासस्थानही अडगळीत पडले आहे. भर वस्तीत ही वास्तू असतानाही अभियंता मुख्यालयी राहात नाही. या टुमदार इमारतीची दारे सताड उघडी आहेत. संध्याकाळच्यावेळी दारूड्यांकडून तसेच गांजा पिणाºयांकडून या इमारतीचा वापर केला जातो. अंधार पडल्यानंतर अनैतिक प्रकारही या ठिकाणाहून चालत असल्याची माहिती आहे. गर्दी वाढत असल्याने परिसातील लोकांसाठी हा प्रकार धोक्याचा ठरत आहे. कुणी हटकण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धाऊन येण्यापर्यंत मजल गेली आहे.
या इमारतीचा वापर झाल्यास गैरकृत्य थांबून नागरिकांना सुरक्षितता मिळू शकते. किमान या इमारतीची देखभाल दुरुस्ती तरी नियमितपणे केली जावी, अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.