नेर नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा
By Admin | Updated: June 25, 2017 00:09 IST2017-06-25T00:09:52+5:302017-06-25T00:09:52+5:30
नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे.

नेर नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा
केवळ तिघांवर काम : १५ कर्मचाऱ्यांची एकाचवेळी बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या पालिकेचा कारभार सुरू आहे. कार्यरत असलेल्या १८ पैकी १५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
१ जून रोजी या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र रिक्त जागांवर नवीन कर्मचारी पाठविण्यात आलेला नाही. शहरातील ४५ हजार नागरिकांचा थेट संबंध नगरपरिषदेशी येतो. शहर स्वच्छतेसह सांडपाण्याच्या नाल्या, पिण्याचे पाणी आदी बाबींची पूर्तता नगरपरिषदेकडून केली जाते. शहराचा व्याप पाहता आधीच तुटवडा असताना बदली सत्र राबविण्यात आले. एका-एका कर्मचाऱ्याकडे दोन-दोन टेबलचा प्रभार होता. आता या टेबलवरील सर्व कामे ठप्प पडली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, पर्यवेक्षक स्थापत्य अभियंता, नगर अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक, लेखापाल, कार्यालय निरीक्षक, कर निरीक्षक, सहायक निरीक्षक, मिळकत पर्यवेक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन पर्यवेक्षक, नगर रचनाकार, सहायक समाज कल्याण अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आदी पदे एकाचवेळी रिक्त झाली आहेत. त्यामुळे तीन कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.