कार्यालयात खर्रा खाणाऱ्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली
By Admin | Updated: March 4, 2016 02:28 IST2016-03-04T02:28:11+5:302016-03-04T02:28:11+5:30
येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली होती.

कार्यालयात खर्रा खाणाऱ्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली
प्रतिनियुक्ती रद्दचे आदेश : बांधकाम विभागाला सीईओंची भेट
कळंब : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली होती. या भेटीत त्यांना काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. एवढेच नाही तर प्रवीण बहादे हा कर्मचारी चक्क खर्रा खाऊन सीईओंच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. त्यामुळे त्याचे एक इंक्रिमेंट बाद करण्यात आले.
वैशाली सोयाम व नितीन सहारे हे दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेत दौऱ्यावर असल्याचे पत्र देऊन फिरत होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचेवरही कडक कारवाई केली जाणार आहे. नीलेश डुमोरे यांची परस्पर केलेली प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्यात आलेली आहे. तसे आदेशही बांधकाम विभागाला प्राप्त झाले आहे, अशी माहीती बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे यांनी दिली. विशेष म्हणजे प्रवीण बहादे हा कर्मचारी सीईओंसमोर चक्क खर्रा खाऊन होता. त्याच स्थितीत तो त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
आपण काय खाले, असे त्यांना विचारले असता त्यांनी मी खर्रा खाऊन आहे असे प्रति उत्तर डॉ.कलशेट्टी यांना दिले होते. यावरुन कर्मचाऱ्यांची मुजोरी कोणत्या स्थराला गेली, याचा प्रत्यय येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी हे कर्मचारी असे बोलतात, यावरून सर्वसामान्य जनतेशी यांचा कसा व्यवहार असेल, याची कल्पना न केलेली बरे.
विशेष बाब म्हणजे जे कर्मचारी फिल्ड वर्क करतात त्यांची कुठलीही नोंद कार्यालयीन वहित करण्यात आली नव्हती. ही बाब सुदधा या ठिाकणी नेहमीचीच आहे. याविषयी डॉ.कलशेट्टी यांनी नाराजी व्यक्त करुन कामाची नोंद घेण्याचे आदेश दिले होते. इतर विभागातही हिच स्थिती आहे. त्यामुळे तेथेही फिल्ड वर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)