ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांची नकारघंटा, काहींना यश

By Admin | Updated: April 19, 2015 02:11 IST2015-04-19T02:11:30+5:302015-04-19T02:11:30+5:30

ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उणेपुरे चार दिवस उरले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Employees rejected for election duty for Gram Panchayat, some to achieve success | ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांची नकारघंटा, काहींना यश

ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांची नकारघंटा, काहींना यश

नेर : ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उणेपुरे चार दिवस उरले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना या कामगिरीवर नियुक्त केले जात आहे. मात्र काही लोकांकडून या ड्युटीसाठी नकारघंटा सुरू आहे. यात शिक्षकवर्ग आघाडीवर आहे. अधिकाऱ्यांनी लावलेली ड्यूटी काहीही करून रद्द करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. यात काही जण यशस्वीही झाले आहेत. ही बाब अधिकारी वर्गांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात २२ एप्रिल रोजी होत आहे. यासाठी पोलीस, महसूल, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जात आहे. यात शिक्षकांचाही समावेश आहे. इतर विभागातील कर्मचारी ही ड्यूटी करण्यास तत्पर असले तरी शिक्षकांकडून मात्र नाक मुरडले जात आहे. सुरुवातीला तर ही ड्यूटी नकोच असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र संबंधित विभागाने त्यांना आदेश दिल्यानंतर वशिला लावून ड्यूटी रद्द करून घेतली. काहींनी तर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून यापासून दूर जाण्यात ते यशस्वी झाले.
काही लोकांनी गावातील पुढाऱ्यांचीही मदत घेणे सुरू केले आहे. असे काही महाभाग या शिक्षकांच्या मदतीसाठी धावले आहे. त्यांच्या चकरा महसूल कार्यालयात वाढल्या आहेत. जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांकडूनही वशिला लावण्यात काही जण मागे नाहीत. या प्रकारात प्रामाणिकपणे ड्यूटीवर जाण्यास तयार असलेल्या शिक्षकांवर मात्र अन्याय होत आहे. शिवाय संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक ड्यूटीवर कार्यरत असताना झालेली चूक नोकरीवर गदा आणणारी ठरू शकते. या भीतीपोटीच अनेकांनी यापासून कुठल्याही प्रकारे प्रयत्न करून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Employees rejected for election duty for Gram Panchayat, some to achieve success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.