उमेदवारांच्या आॅनलाईन अर्जासाठी कर्मचारी दिमतीला
By Admin | Updated: October 21, 2016 02:20 IST2016-10-21T02:20:32+5:302016-10-21T02:20:32+5:30
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

उमेदवारांच्या आॅनलाईन अर्जासाठी कर्मचारी दिमतीला
आर्णी : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करावा लागणार आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय भाकरे यांनी निवडणुकीच्या निमित्ताने ही माहिती दिली. आॅनलाईन नामांकनासाठी उमेदवारांना मदत व्हावी म्हणून तहसील व शहरातील महा ई-सेवा केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी ठेवले जाणार आहे.
प्रत्येक उमेदवाराला दीड लाख रुपयांची खर्च मर्यादा राहणार आहे. यात खर्चाचे नियमित विवरण द्यावे लागणार आहे. पारदर्शकतेसाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते काढावे लागणार आहे. या खात्याद्वारेच निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. खर्चाची पडताळणी होणार आहे. सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग कुणी करत असेल, तर जनतेनेही लक्ष ठेवून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, याबाबत अडचण आल्यास तहसील कार्यालयात संपर्कासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येईल किंवा निवडणूक अधिकारी विजय भाकरे, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, तहसीलदार सुधीर पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)