कर्मचारी चिंतेत, तर नागरिक कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:37 IST2022-01-05T05:00:00+5:302022-01-04T22:37:56+5:30
महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.

कर्मचारी चिंतेत, तर नागरिक कोंडीत
विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपावरून ६५ दिवस ओलांडून गेले आहेत. या काळात कर्मचारी वर्गही चिंतेत पडला आहे. महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.
आतापर्यंत ३१५ निलंबित
संपात सहभागी झालेल्या यवतमाळ विभागातील ३१५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय १०६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ९८ जणांची बदली झाली आहे.
आता लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे
दोन महिन्यांपासून पगार नाही. आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता लक्ष न्यायालयाकडे आहे. आम्हाला न्याय मिळेल.
- गणेश शेंडगे, वाहक
आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. बसेस बंद असल्याने नागरिकांनाही त्रास होत आहे.
- गीता श्रीवास, वाहक
एसटीनेच सुरक्षित प्रवास
एसटी बस नसल्याने दुचाकी व इतर साधनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. एसटी बस सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे. ती लवकर सुरू व्हावी.
- दीपक रामटेके, प्रवासी
कार्यप्रसंगासाठी खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बस सुरू झाल्यास एकट्यालाही प्रवास करणे सोयीचे जाते.
- धीरज भोयर, प्रवासी
दिवसभरात २०४३ जणांचा एसटीने प्रवास
- यवतमाळ विभागातील सात आगारामधून मंगळवारी एसटी बसेस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २०४३ जणांनी प्रवास केला.
- यवतमाळ विभागातील पुसद आणि उमरखेड या दोन आगारातून मंगळवारी एकही बसफेरी सुटली नाही. दारव्हा आगारातून केवळ एक बस यवतमाळकरीता सुटली.